अकोला: राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धूम आहे. अनेक ठिकाणी ही निवडणूक गाजतेय ती नात्या-गोत्यांनी, एकाच परिवारातल्या उमेदवारांनी.


आरक्षणामुळे अनेक ठिकाणी घरातील पत्नी, आई अथवा इतर सदस्याला उमेदवारी देण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी पती-पत्नी, आई-मुलगा, दीर-भावजय अशा जोड्या निवडणूक रिंगणात दिसत आहेत.

अकोल्यात आठ दाम्पत्य निवडणूक रिंगणात आहेत. तर 2 माय-लेक निवडणूक लढत आहेत. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 15 मध्ये पंकज साबळे आणि त्यांची आई उषा साबळे मनसेकडून निवडणूक रिंगणात आहेत.

तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक प्रशांत भारसाकळ आणि त्यांची आई करूणा आपलं नशिब आजमावत आहेत.

प्रभाग 15 मध्ये प्रचाराचा धडाका

या मायलेकांनी सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. पंकज साबळे हे अकोल्यातील मनसेचा चेहरा आणि अकोला शहराध्यक्ष आहेत.

ते वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी 2007 ते 2012 या काळात अकोला महापालिकेत मनसेचे नगरसेवक होते. त्याआधी त्यांची आई उषा ह्या 2002 ते 2007 या काळात शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. मात्र, प्रत्येकवेळी एकट्याने निवडणूक लढविणारे हे मायलेक यावेळी प्रथमच सोबत नगरसेवक होण्यासाठी आपलं नशिब आजमावत आहेत.

प्रभाग 13

अकोल्यातील प्रभाग क्रमांक 13 मध्येही राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक प्रशांत भारसाकळ आणि त्यांची आई करूणा आपलं नशिब आजमावत आहेत.

साबळे आणि भारसाकळ मायलेकांच्या उमेदवारीची मोठी चर्चा अकोल्यात आहे.

मुलासोबत राजकारणाच्या आखाड्यात उमेदवार म्हणून सहभागी होण्याचा क्षण पंकज यांच्या आई उषा यांच्यासाठी शब्दाच्या पलिकडचा आहे. निवडून आल्यास मुलगा आणि आई किती चांगलं काम करतील याचा आदर्श घालून देण्याची मनिषा त्या व्यक्त करतात.

दैनंदिन जीवनात आई-वडिल आपला वारसा मुलांकडे सोपवत असल्याचं आपण पाहतो. राजकारणात हा वारसा अनेकदा पत्नी, मुलगा, मुलगी किंवा भावाकडे गेल्याचं आपण पाहिलं. मात्र, आईने आपला राजकीय वारसा चालविण्यासाठी मुलाकडे देतांनाच स्वत:ही त्या वारशाचा भाग राहण्याचं दाखविणारी ही निवडणूक.

अकोल्याच्या महापालिकेत नगरसेवक होण्याचं या दोन्ही मायलेकांच्या जोड्याचं स्वप्न अकोलेकर कीतपत पूर्ण करतात, याचं उत्तर मात्र २३ तारखेच्या मतमोजणीलाच कळेल.

निवडणूक रिंगणातील दाम्पत्य, पक्ष आणि प्रभाग :

क्र.  दाम्पत्य                                  पक्ष             प्रभाग

१. विजय-सुनिता अग्रवाल          भाजप           ५ व १३
२. संजय-माधुरी बडोणे               भाजप          १९ व १६
३. जगजितसिंग-उषा विरक       राष्ट्रवादी         १२
४. राजेश-अनिता मिश्रा             शिवसेना          १७
५. राजेश-अर्चना काळे              शिवसेना        ९ व ८
६. शरद-वैशाली तूरकर               शिवसेना        २
७. सुनिल-माधुरी मेश्राम              अपक्ष            ७
८. संजय-स्वाती तिकांडे              अपक्ष              ८