पुणे : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठ (Pune Crime News) आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.  पोलीस पथक आणि भरारी  पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे 65 लाखांची रोकड आणि  एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.


आचारसंहिता काळात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ 8एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी  काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून  गाडीतून  13 लाख 90 हजाराच्या  500रुपयांच्या नोटा आणि 30 लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन  जप्त केले आहे.


तर दुसऱ्या एका घटनेत 10 एप्रिल रोजी दुपारी  शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना  शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून 51 लाख 16 हजाराची  रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली.  सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून  प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.


 घाटकोपरमध्येही कारवाई


काहीच दिवसांपूर्वी निवडणूकीचे  बिगुल वाजलं तोच घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. इलेक्शन सेलच्या (Election Cell) स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून 72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स  स्कॉड अधिक तपास करत आहेत.