अकोला : अकोला जिल्हा परिषदेवर सलग पाचव्यांदा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप बहुजन महासंघाने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपच्या 7 सदस्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यानं भारिप उमेदवाराचा विजय सुकर झाला. त्यामुळं भाजपनं भारिप उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदतच केल्याची चर्चा रंगत आहे. भाजपच्या या खेळीनं काँग्रेस आणि शिवसेना सत्तेपासून दूर राहिली. अध्यक्षपदी भारिपच्या प्रतिभा भोजने तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या गोपाल दातकरांचा 25 विरूद्ध 21 मतांनी पराभव केला आहे. तर उपाध्यक्षपदी भारिपच्याच सावित्री राठोड यांची निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसच्या सुनिल धाबेकरांचा यांचा 26 विरूद्ध 21 मतांनी पराभव केला आहे.


अध्यक्षपदासाठी भारिपच्या प्रतिभा भोजने, काँग्रेसचे सुनिल धाबेकर आणि शिवसेनेच्या गोपाल दातकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. काँग्रेसच्या सुनिल धाबेकरांना उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी भारिपच्या प्रतिभा भोजने आणि शिवसेनेच्या गोपाल दातकर यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये दातकरांचा 25 विरूद्ध 21 मतांनी पराभव करीत प्रतिभा भोजने अध्यक्षपदी विजयी झाल्या. प्रतिभा भोजने तेल्हारा तालूक्यातील भांबेरी मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत.

उपाध्यक्ष पदासाठी भारिपच्या सावित्री राठोड, काँग्रेसचे सुनिल धाबेकर आणि शिवसेनेच्या गोपाल दातकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. शिवसेनेच्या गोपाल दातकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी भारिपच्या सावित्री राठोड आणि काँग्रेसच्या सुनिल धाबेकर यांच्यात लढत झाली. यात सुनिल धाबेकरांचा 25 विरूद्ध 21 मतांनी पराभव करीत सावित्री राठोड उपाध्यक्षपदी विजयी झाल्या. सावित्री राठोड पातूर तालूक्यातील चोंढी मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत.

53 सदस्यीय अकोला जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहूमत मिळालेलं नाही. मात्र, 22 जागा जिंकत भारिप-बहूजन महासंघ सर्वात मोठा पक्ष ठरला होता. विजयी झालेल्या चारपैकी तीन अपक्ष भारिपसोबत गेल्यानं भारिपचं संख्याबळ 25 झालं. मात्र, मॅजिक फिगर असलेला 27 च्या आकड्यासाठी भारिपला दोन सदस्य कमी पडत होते. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्रित सदस्यसंख्या 20 एवढी होती. त्यामूळे बहूमतासाठीच्या 27 आकड्यासाठी भाजपच्या सात सदस्यांची आवश्यकता महाविकास आघाडीला होती. मात्र, त्यासाठी भाजपनं अध्यक्षपद शिवसेनेला मिळू नये अशा अटी ठेवल्या. काँग्रेसला अध्यक्षपद देण्यासाठी भाजपनं आग्रह केला. याला शिवसेनेचा प्रखर विरोध होता. अखेर शिवसेनेनं आपला विरोध मागे घेत काँग्रेसला अध्यक्षपद आणि स्वत:कडे उपाध्यक्षपद घेण्याचं मान्य केलं. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्याची शक्यता बळावली होती. मात्र, ऐनवेळी भाजपनं या आघाडीला सुरूंग लावत मतदानावर बहिष्कार टाकल्यानं जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचं महाआघाडीचं स्वप्नं भंगलं. आजच्या राजकीय नाट्याचे पडसाद पुढच्या काही काळात जिल्ह्याच्या राजकारणावर पडणार आहेत.

 अकोला जिल्हा परिषदेतील विजयाचे अन्वयार्थ :

* तब्बल पाचव्यवंदा सत्ता स्थापन करीत प्रकाश आंबेडकरांनीअकोला जिल्हा परिषद आपला गड असल्याचे सिद्ध केले.
* लोकसभा, विधानसभेतील सततच्या पराभवाने खचलेल्या कार्यकर्त्यांना या विजयानं नव्या आत्मविश्वासाचा बुस्टर मिळणार.
* सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारिपची सत्ता. जिल्हा परिषदेतील सत्तेनं जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर भारिपचं वर्चस्व.
* केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक अपयशी ठरली. संख्याबळ आलं 11 वरून सातवर.
* प्रकाश आंबेडकरांच्या 'अकोला पॅटर्न'ला नवं बळ देणारा विजय.

एकूण जागा : 53
भारिप : 22
सेना : 13
भाजप : 07
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 03
अपक्ष : 04