मुंबई : वाडियाच्या भूखंडावर बड्या अधिकाऱ्यांचा डोळा असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. या संदर्भात अनुदान रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी देखील प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ही जागा प्राईम लोकेशनवर असल्यामुळे यावर अधिकाऱ्यांचा डोळा. यामध्ये तथ्य असून भूखंड हडपण्यासाठी काही बैठका झाल्या का? अनुदान मुद्दाम उशीरा दिलं का? याबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.


एबीपी माझाशी बोलताना दरेकर म्हणाले की, अनुदानाचं निमित्त दाखवून, मोठा मलिदा खाऊन, भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार काही अधिकाऱ्यांचा आहे का? अशी मला शंका आहे. महापालिकेनं अजून अनुदान दिलं नाहीये. त्यामुळे जे संबंधित अधिकारी आहेत त्यात फायनन्स विभागापासून ते सर्व वरिष्ठांपर्यंत चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अधिकारी कोण आहेत हे येणाऱ्या काळात कळेल. अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण केल्या तर हे स्पष्ट होईल की यामध्ये काही काळंबेरं आहे. ही नफा कमवायची लाईन आहे. त्यामुळे यांसदर्भात चौकशी झाली पाहिजे, असे दरेकर म्हणाले.

स्मारकांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे मात्र, रुग्णालयासाठी नाहीत, हायकोर्टाने झापलं

स्मारकांची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत. मात्र, रुग्णालयाच्या ट्रस्टला देण्यासाठी नाहीत. या शब्दांत गुरुवारी वाडिया हॉस्पिटलसाठीच्या निधीवरुन हायकोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं. तसेच येत्या 24 तासांत वाडिया हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध न झाल्यास संबंधित सर्व अधिकाऱ्यांची कोर्टात परेड घेऊ, असं हायकोर्टानं संबंधित वकिलांना सुनावलं. त्यावर संबंधित निधी ताताडीनं उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली आहे. नवं सरकार तरी वाडिया रुग्णालयाला निधी देणार आहे की नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला गेल्या सुनावणीत विचारला होता.

निधी अभावी वाडिया रुग्णालय चालवणं प्रशासनाला अवघड जात असून हे रुग्णालय आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुंबई महानगरपालिकेनं या रुग्णालयासाठी 14 कोटी तर राज्य सरकारनं 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असला तरी हे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत.

वाडिया हॉस्पिटल व्हेंटिलेटरवर, नवीन रुग्ण भर्ती थांबवली
अख्खं लालबाग परळ जिथं जन्माला आलं ते वाडिया हॉस्पिटल सध्या व्हेंटिलेटरवर आहे. वाडिया हॉस्पिटल प्रशासनानं निधी अभावी नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवली आहेत. तसेच उपचार घेत असलेल्या 300 हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर मॅटर्निटी डिपार्टमेंटमधील 100 पेशंट घरी पाठवले आहेत. वाडिया हॉस्पिटलमध्ये सध्या बोनमॅरो ट्रान्सप्लांट, हृदयरोग, मूत्रपिंड इत्यादी सर्व शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. शस्त्रक्रियांपासून बाह्यरुग्णापर्यंत सर्व विभाग हळूहळू बंद करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. पालिका, राज्य सरकार आणि रुग्णालय प्रशासनाच्या वादाचा फटका मात्र रुग्णांना बसत आहे. बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे 30 कोटी आणि नौरोजी वाडिया रुग्णालयाचे 105 कोटी असे सुमारे 135 कोटी रुपये पालिकेकडे थकित आहेत. वाडिया रुग्णालयाला मागील तीन वर्षांपासूनच्या थकीत रकमेपैकी केवळ 13 कोटी रुपये देण्यात आले आहेत.