बीड : कट्टर राजकीय विरोधक असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले आहेत. गहिनीनाथ गडावरच्या एका कार्यक्रमात दोघे एकत्र दिसले. एकमेकांवरच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळं बीडची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. विधानसभा निवडणुकीनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र आले. गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांचा 42 व्या पुण्यतिथी महोत्सव पार पडतोय. त्यानिमीत्ताने हे भाऊ-बहीण एकाच व्यासपीठावर दिसले.


यापूर्वी दरवर्षी पंकजा मुंडे व्यासपीठावर असतात. तर, धनंजय मुंडे हे पहाटेची पूजा करुन जातात. मात्र, यावेळी नव्यानेच पालकमंत्री बनलेल्या धनंजय मुंडे यांचीही हजेरी गहीनाथ गडावरच्या या जाहीर कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. यापूर्वी परळीमधल्या एका कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकच आले होते. मात्र, आता निवडणुकांनंतर प्रथमच कट्टर राजकीय विरोधक असलेले मुंडे बहीण-भाऊ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.

बहीण-भाऊ राजकारणात कट्टर विरोधक -
नात्याने भाऊ-बहीण असलेले पंकजा आणि धनंजय हे राजकारणात मात्र परस्परांचे कट्टर विरोधक बनले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांना त्यांचा राजकीय वारसदार मानले जात होते. मात्र, 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. परिणामी धनंजय मुंडे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. तर, 2013 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी जाहीर प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.

विधानसभा निवडणुकीत संघर्ष - 

विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे परळी विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधान केले होते. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापलं होतं. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. तेव्हापासून पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले नाही.

संबंधित बातम्या -

Bhagvangad | महाप्रसादाचं ताट पंकजा मुंडेंनी नाकारलं : नामदेव शास्त्री | ABP Majha