अकोला : अकोला शहर विदर्भातील कोरोनाचं सर्वात मोठं 'हॉटस्पॉट' बनलं आहे. अकोल्यानं मंगळवारी उपराजधानी नागपूरलाही रूग्णसंख्येत मागं टाकलं आहे. अकोल्यात बुधवारी दुपारपर्यंत 507 रूग्णांची नोंद झाली आहे. तर नागपुरचा आजचा आकडा 441 आहे. अकोल्यात आतापर्यंत तब्बल 28 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. विदर्भात कोरोनामुळे आतापर्यंत 57 रूग्णांचे बळी गेलेत. या बळींमध्ये 50 टक्के वाटा एकट्या अकोल्याचा आहे. अकोल्यातील रूग्णसंख्या अनियंत्रित होण्यास प्रशासनाचा ढिसाळपणा आणि लोकप्रतिनिधींची असंवेदनशीलता प्रामुख्याने कारणीभूत असल्याची भावना अकोलाकरांमध्ये आहे. शहराचा 90 टक्के भाग सध्या 'कंटेन्मेंट झोन'मध्ये आहे. आताही प्रशासन जागं न झाल्यास अकोल्यात कोरोनाचा उद्रेक हाताबाहेर जाण्याची परिस्थिती आहे.


एकीकडे अकोल्यात स्थिती गंभीर होत असताना नागपूर शहर कोरोनाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी दमदारपणे पावलं टाकतं आहे. उपराजधानी नागपुरात रूग्णवाढीचा वेग मंदावलेला असताना अकोल्यात मात्र तो उत्तरोत्तर वाढतच आहे. तर मृत्यूच्या आकड्यांमध्ये अकोला नागपूरच्या खुप समोर निघून गेलं आहे. नागपुरात कोरोनाचा पहिला रूग्ण 11 मार्च रोजी आढळला होता. तर तेथून तब्बल जवळपास एक महिन्यानं 7 एप्रिलला अकोल्यात पहिला रूग्ण आढळला. मात्र, आज नागपूरची रूग्णसंख्या 441 आहे आणि अकोल्याची रूग्णसंख्या तब्बल 465 वर पोहोचली आहे. नागपूर हे अकोल्याच्या तब्बल पाचपट मोठं शहर आहे. अकोल्याची लोकसंख्या 5 लाख आहे. तर नागपूरची लोकसंख्या 25 लाखांवर आहे.


नागपुरात अकोल्याच्या तुलनेत रूग्णांची काळजी घेतली गेली. ज्या परिसरात रूग्ण आढळला तो परिसर सील करून तिथे लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली गेली. रूग्णांचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट याच्या अनुषंगानं आरोग्य यंत्रणांनी प्रभावी काम केलं. अकोल्यात मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. अकोल्यात जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस प्रशासनात समन्वयाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे अकोल्यातील संपूर्ण नियोजनच कोलमडलं आहे.


विदर्भातील कोरोना बळींची संख्या




  • अकोला : 28

  • नागपूर : 08

  • बुलडाणा : 03

  • वाशिम : 01

  • यवतमाळ : 00

  • अमरावती : 15

  • भंडारा : 00

  • गोंदिया : 01

  • चंद्रपूर : 00

  • गडचिरोली : 00

  • वर्धा : 01


नागपुरात 82 टक्के कोरोनामुक्त, अकोल्यात 66 टक्के कोरोनामुक्त


नागपूरमध्ये 300 रूग्णांचा टप्पा गाठायला तब्बल 63 दिवस लागलेत. मात्र, अकोल्याने हा आकडा फक्त 43 दिवसांतच गाठला. नागपुरात कालपर्यंत 433 रूग्ण असताना यातील 356 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अकोल्यात आज 507 रूग्ण असून त्यातील 315 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका आणि पोलीस प्रशासनात असमन्वय


अकोल्यातील जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महापालिका आणि पोलीस प्रशासनात कोणताही समन्वय नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. संपूर्ण कोरोना संकटाच्या काळात जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर प्रत्यक्ष 'फिल्ड'वर दिसले नाहीत. अकोला शहरातील एका पोलीस निरीक्षकासह 11 पोलीसांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून आपल्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची भावना वाढविण्याचे ठोस प्रयत्न होतांना दिसत नाही.


जिल्हा रुग्णालयात सुविधांचा मोठा अभाव आहे. मात्र, पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यात अपयशी झाल्याचं चित्रं आहे. जिल्हा प्रशासनानं कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना सार्वजनिक व्यवहारांसाठी नागरिकांना 5 वाजेपर्यंत सूट दिली आहे. शहरात 16 रूग्ण असतांना शहर दुपारी 12 नंतर बंद व्हायचं. आता रस्त्यावरील गर्दी पाहता शहरात संचारबंदीचा कोणताही मागमुस येथे दिसत नाही. एरव्ही बैठकीच्या निमित्तानं शहरात येणारे पालकमंत्री बच्चू कडूंनी आता अकोल्यात तळ ठोकणं आवश्यक आहे. तरच ढेपाळलेलं प्रशासन यातून बाहेर पडण्यासाठी कडक उपाययोजना करू शकेल.


अकोल्यासाठी सरकारनं विशेष अधिकारी नेमणं आवश्यक


अकोल्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. त्यामूळे सरकारनं मालेगाव, सोलापूरच्या धर्तीवर अकोल्यासाठीही एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. अकोल्यात महापालिका वगळता इतर यंत्रणा कितपत काम करत आहेत, याचाही शोध सरकारनं घेणं गरजेचं आहे.


अकोल्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि वाढते मृत्यू ही मोठी चिंतेची बाब आहे. पुढच्या काळात अकोल्यावरचं हे संकट दूर करण्यासाठी प्रशासन, आरोग्ययंत्रणा, महापालिका, पोलीस प्रशासन अन् पर्यायानं जनताही जबाबदारीने वागली तरच अकोल्यावरचं कोरोनाचं काळं संकट दूर होऊ शकेल.


Corona | नोटांपासून कोरोना टाळण्यासाठी अनोखी शक्कल; चिमट्यानं नोटांना स्पर्श, मग थेट नोटांवर इस्त्री