मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार महाराष्ट्रात सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. कोरोनासारख्या संकटाच्या परिस्थितीत विरोधक सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं, मात्र ते सरकार अस्थिर करण्याच्या मागे लागलेत. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने केलेल्या मदतीची आकडेवारी दिली, ती चुकीची आहे, असं जयंत पाटलांनी म्हटलं. केवळ आकडेवारी सांगण्यापेक्षा राज्य सरकारसोबत उभं राहायला पाहिजे. जेणेकरुन तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरणार नाहीत, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.


कोरोनाच्या काळात राज्य सरकार चांगलं काम करतं आहे. देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रुग्णालये उभारण्यात आली आहेत. कोणत्या राज्याशी तुलना करायची नाही पण, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं. मजुरांना घरी जाण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पैसे देण्यात आले. केंद्र सरकारकडे जी मदत मागितली, ती पुरेशा प्रमाणात मिळाली नाही, असंही जयंत पाटलांनी सांगितल.


मुंबईसह राज्याच्या विविध भागातून मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परतले. याचा उद्योग, व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तरुणांकडे ते कौशल्य नसल्याचं वक्तव्य केलं होतं. याला उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील तरुणांमध्ये स्किल आहे. जे मजूर राज्यातून परत गेले आहेत, ते पुन्हा येतील. पण त्याआधी कारखाने, उद्योग सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणारं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला.


संबंधित बातम्या