पुणे : मुंबई- पुणे द्रुतगतीवर टोलवाढ करण्यात आली आहे, या टोलवाढीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समर्थन दर्शवलं आहे आणि ही टोलवाढ का करण्यात आली आहे याची कारणंदेखील सांगितली आहेत. अजित पवार म्हणाले, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग चकाचक करण्यात आला आहे. या मार्गावर कोट्यवधी पैसे खर्च करण्यात आले आहे, मार्गावर चांगल्या सुविधा पुरवण्यात येत आहेत, त्यामुळे टोल वाढ करण्यात आली आहे.  तुम्ही जुन्या पुणे-मुंबईने द्रुतगती मार्गाने  प्रवास  करुन पहा म्हणजे टोलवाढ का केली? याचं उत्तर मिळेल, असं अजित पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकदेखील बांधण्यात येत आहे. त्यासाठीदेखील कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. चांगले  रस्ते आणि  चांगल्या सुविधा तुम्हाला पुरवायच्या आहेत. त्यामुळे थोडी टोल भरण्याचीदेकील मानसिकता ठेवावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


सत्तेत का सहभागी झाले?


पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू आणि लाल बहाद्दूर शास्त्री आपण पाहिले. त्यानंतर इंदिरा गांधी कणखर आणि मजबूत नेत्या होत्या. पोलादी नेत्या म्हणून त्या नावाजल्या गेल्या. मग पंतप्रधान म्हणून राजीव गांधींनी एक क्रांती घडवली. त्यांच्यामुळे कॉम्प्युटर आणि मोबाईल देशात आले. राजीव गांधींच्या जाण्यानं नवं नेतृत्व मिळत नव्हतं. त्यानंतर वाजपेयी आले. मग डॉ मनमोहन सिंह आले. ते मात्र खूप शांत होते, पण त्यांचा तो स्वभाव होता. त्यानंतर नरेंद्र मोदी आले. आधी मी ही त्यांना विरोध केला, सुरुवातीला पाच आणि नंतरची चार अशी नऊ वर्षे आपण पाहिली. आता चांद्रयान तीन चंद्रावर पाठवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी मोदी कसे उभे होते. ते साऊथ आफ्रिकेत होते, मात्र तिथून ही मोदी या ऐतिहासिक क्षणाचे अपडेट घेत होते. चांद्रयान तीन चंद्रावर विसावताच मोदी साहेबांनी तातडीनं शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या. असा हा नेता आहे, म्हणून आपण या सत्तेत सहभागी झालो आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.


उत्तम आरोग्य सेवा देण्यावर भर


राज्य शासनाने नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेषतः अतिदक्षता विभागात अनुभवी डॉक्टरांची नेमणूक करा. येत्या काळात शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचा विचार करण्यात येत आहे, असंही पवार म्हणाले.


दर्जेदार शिक्षण देण्यावर भर द्या...



विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी सुसज्ज इमारत, स्वच्छतागृह, ई-क्लासरुम आदी पायाभूत सुविधा उभारणी भर द्यावा. मनपा प्राथमिक शाळेत ई-क्लासरुम करताना वायफाय, एचडी कॅमेरे, एलईडी डिस्प्ले आदी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करा. 'आयटीआय'मध्ये रोजगार निमिर्तीच्या अनुषंगाने अभ्यासक्रम सुरु करा. नवीन शाळेची इमारत करताना त्यामध्ये मराठी माध्यमासोबत गोरगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचाही प्रयत्न करावा, अशा सूचना दिल्या.


प्रदूषणमुक्त आणि झोपडपट्टी मुक्त शहर करण्यावर भर


प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक धोरणाप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याची कार्यवाही करावी. कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यापासून वीज निमिर्ती करण्यावर भर द्या, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या भागात स्मशानभूमी आणि दफनभूमी निर्माण कराव्यात. शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. बेघर नागरिकांना पक्के घरे देण्याची कार्यवाही करा, असंही ते म्हणाले.


ही बातमी वाचा: