Sanjay Raut on Sharad Pawar Statement: सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे, ती शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्यामुळे. अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते, त्यांनी वेगळी भूमिका घेतली म्हणजे, फूट पडली असं होत नाही, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि राजकारणात चर्चांना उधाण आलं. अशातच थोरल्या पवारांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार गटानं शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असा होतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "भाजपसोबत हातमिळवणी केली, हा पक्षद्रोह आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली. त्याचपद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट फुटला आणि पक्षाच्या विचारधारेविरोधात भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर त्या पक्षानं अजित पवारांसह काही प्रमुख लोकांची हकालपट्टी केली. याला फूट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? फूट आहे."
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी, ही फूट नाही का? : संजय राऊत
"राज्यामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत. एक जयंत पाटील, दुसरे सुनील तटकरे. मग ही फूट नाही का? अजित पवार गटानं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. मग ही फूट नाही का? लोकांच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. लोकांनी ठरवलंय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. एका गटानं भाजपसोबत ईडीच्या भितीनं हातमिळवणी केली आहे आणि स्वतः शरद पवार आणि त्यांचे सगळे प्रमुख सहकारी, समर्थक, त्यांना मानणारा जो वर्ग आहे, जो एका वैचारिक लढ्याचं नेतृत्त्व करतोय. शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मानतोय, तो मोठा गट आज महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीनं ठरवलेलं आहे. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात किंवा देशपातळीवर भाजपचा पराभव करायचा.", असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, "अजित पवार कुठे आहेत? किंवा त्यांचा गट कुठे आहे, याच्याशी आता आम्हाला काहीही पडलेलं नाही. जर दोन गट पडलेले नाहीत, मग सुनिल तटकरे कोणत्या पक्षाचे आहेत? ज्या तटकरेंची हाकालपट्टी करण्यात आली आहे. ते तटकरे राष्ट्रवादीच्या एका गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही जयंत पाटलांशी चर्चा करु आणि आम्ही शरद पवारांशी चर्चा करु. आम्ही तटकरे किंवा अजित पवार यांच्याशी महाविकास आघाडीसंदर्भातील कोणत्याही निर्णयासंदर्भात चर्चा करत नाही." तसेच, शरद पवार कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.