भाजप सरकारला घरी बसवण्यासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढत फिरत आहोत. हे सरकारला पायउतार केल पाहिजे. कारण यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे जीव जात आहेत. केंद्राचे पथक दुष्काळाची पाहणी करायला आले आणि घोड्यावर पाहणी करुण निघून गेले. शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम यांनी केलं नाही. शरद पवार यांनी जे शेतकऱ्यांसाठी केलं ते ही सरकार करु शकलं नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.आदिवासी आश्रम शाळेत बनावट वस्तुंचा पुरवठा करुन ते पैसे लुटायचं काम या सरकारने केलं, अशा शब्दात अजित पवार यांनी भाजपवर घणाघात केला.
राज्यात दोन लाख जागा रिक्त असताना भरल्या जात नाहीत. ' मोठ घर पोकळ वासा, वारा जाई भसा-भसा,' अशा उपाहासात्मक शब्दात अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. 3 हजार कोटी खर्च करुन वल्लभभाईंचा पुतळा उभारण्यात आला, मात्र त्याची गरज काय? लोकांना फक्त भावनिक मुद्द्यांवर फसवण्याचं काम हे सरकार करत आहेत, असेही पवार म्हणाले.
दादरी प्रकरणाचा उल्लेख करत अजित पवार म्हणाले, काही लोकांना गोमांसच्या नावावर मारुन टाकतात आणि तपासानंतर म्हणतात ते मांस गाईचे नव्हते. अजून किती अत्याचार हे सरकार करणार आहे? असा सवाल अजित पवारांनी केला.