लातूर : लातूरच्या उदगीरमधील धर्मांतर करुन आफ्रिकेतील टांझानियाला निघालेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. नरसिंग जयराम भूतकर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मुस्लीम धर्म स्वीकारुन त्यानं मोहम्मद रेहमान इब्रे आदम असं नवं नाव धारण केलं होतं.
नव्या नावाने नरसिंगनं बनावट पासपोर्टही तयार केला. त्या बनावट पासपोर्टच्या आधारे आफ्रिकेला जाण्याच्या तयारित असताना त्याला अटक झाली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा तरुण नेमकं काय करणार होता आणि त्यानं धर्मांतर का केलं याची माहिती दहशतवाद विरोधी पथक घेत आहे.
नरसिंग मुळचा बिदर जिल्ह्यातील जहीरबाद येथील आहे. कामनिमित्त काही वर्षापूर्वी तो उदगीर येथे आला होता. उदरनिर्वाहासाठी तो उदगीरमधील एका बेकरीत काम करीत होता. दरम्यान, त्याने धर्मांतर करुन मुस्लीम धर्म स्वीकारला आणि एका मुस्लीम तरुणीशी निकाह केला. निकाह होताच त्याने पासपोर्टसाठी धर्मांतर केलेल्या नव्या नावाने कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली. मात्र धर्मांतरनंतर आई-वडिलांचे नाव बदलता येत नाही. तरीही नरसिंगने आई-वडिलांचेही काल्पनिक नावाची नोंद केली आणि बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करुन घेतलं.
दरम्यान, पोलीस पडताळणीत पासपोर्ट अर्जावर नमूद करण्यात आलेला पत्ता खोटा आढळून आल्यानं अर्ज रद्द करण्याचा अहवाल उदगीर पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयास दिला. मात्र नरसिंगने पुन्हा लातूर येथील एका एजंटला हाताशी धरुन पीपी फॉर्म भरुन नवीन पत्ता दिला आणि पासपोर्टही तयार करुन घेतला.
या सर्व प्रकरणाची माहिती गुप्त माहितीगाराने दहशतवादविरोधी पथकास दिल्याने नरसिंगचा प्लॅन फसला. दहशतवादीविरोधी पथकाने उदगीरमध्ये धाड टाकून नरसिंगला अटक केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये होत असलेल्या मुस्लीम धर्माच्या एका धार्मिक कार्यक्रमास जाण्यासाठी एवढा अट्टाहास केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली असून अधिक तपास सुरु आहे.