यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारोप कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आजच्या दिवशी कविता वाचन आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.


साहित्य संमेलनात निरनिराळ्या प्रकाशकांच्या स्टॉलवर गर्दी पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातील लोक इथे सहभागी होताना दिसून येत आहेत. आवडत्या विषयांवरील पुस्तक खरेदीही सुरू आहे. संमेलन स्थळी गर्दी पाहायला मिळत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यामधील छोट्या छोट्या गावांमधून लोकं इथे सहभागी होण्यासाठी आले होते.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून आमंत्रीत करण्यात आलं होत. मात्र विरोध झाल्याने आयोजकांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केलं होतं. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला होता. अनेक मान्यवरांनी सहगल यांचं आमंत्रण रद्द केल्याने संमेलनावर बहिष्कार टाकला होता.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी संमेलनापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मोठ्या वादांनंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. तर उद्घाटनाच्या कार्यक्रमात संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे आणि मावळते संमेलनाध्याक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल प्रकरणावर आयोजकांचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील कार्यक्रमातही नयनतारा सहगल यांचा आमंत्रण रद्द केल्याबद्दल निधेष व्यक्त करण्यात आलं. काल काळ्या फिती घालून साहित्यिकांनी कवितेचं वाचन केलं आणि नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारल्याचा निषेध नोंदवला.

काय आहे वाद?
या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.

सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे
नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला होता. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे, असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले होते.

आपण झुंडशाहीला बळी पडलो : लक्ष्मीकांत देशमुखांचे घणाघात
नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला होता. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती.