मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांची 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सर्वांनीच भुवया उंचावल्याचं पाहिला मिळालं. या भेटीमुळे पुन्हा एकदा अखंड राष्ट्रवादीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारांची गुरूवारी सकाळी दिल्लीत भेट घेतली. प्रथमदर्शनी ही वाढदिवसानिमित्त भेट घेतली अशी माहिती सांगण्यात येत असली तरी यामागे आगामी काळातील राजकीय समीकरणं असू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रफुल पटेल यांनी 10 दिवसांपूर्वीच भेट घेतली
एबीपी माझाला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, 10 दिवसांपूर्वीच प्रफुल पटेल यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतरच खऱ्या अर्थाने इतर नेत्यांच्या शरद पवारांच्या सोबतच्या भेटीसाठीच्या हालचालींना वेग आल्याचं पाहिला मिळत आहे. कारण त्यावेळी अजित पवार देखील 2 दिवस दिल्लीत ठाण मांडून बसून होते. याचाच अर्थ आजची भेट ही योगायाग नाही तर पूर्वनियोजित होती.
पवारांमुळे महायुती भक्कम होऊ शकते
राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की, महायुती सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्यानं जी आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यावर उपाय म्हणून आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी 7 खासदार असले तरी अखंड राष्ट्रवादीचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 9 खासदारांची संख्या होत्या. त्यामुळे शिंदेंची साथ सोडल्यास महायुती भक्कम राहण्यास मदत होते.
भापजच्या विचारधारेला केलेल्या विरोधाचं काय?
एकीकडे शरद पवार सत्तेत जाऊ शकतात असे आडाखे बांधले जात असले तरी दुसरीकडे एकमेकांवर निवडणुकांमध्ये केलेल्या टीकेचं काय? स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना केलेल्या विरोधाचं काय? यासोबत ज्या मुद्द्यावरुन महायुती नको अशी भूमिका शरद पवारांनी घेतली त्या महायुतीच्या विचारधारेचं काय हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जी चर्चा आहे त्यानुसार 1999 ला सोनिया गांधी यांच्या परदेश मुद्द्यावरुन बाहेर पडलेली राष्ट्रवादी निवडणुकांनंतर मात्र काँग्रेस सोबत सत्तेत गेली होती. त्यावेळी शरद पवारांवर खालच्या भाषेत काँग्रेस नेत्यांनी टीका करुन देखील विकासाच्या राजकारणाच्या मुद्यावर हा निर्णय घेण्यात आला होता. राहता राहिला विचारधारेचा विषय तर महायुतीत सत्तेत राहून देखील आम्ही शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा सोडणार नाही हीच भूमिका असणार आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या जरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली असली तरी काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वच नेते हे शरद पवारांच्या भेटीला येणार आहेत. दुसरीकडे शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल आहे. त्यामुळे आगामी काळात अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपणास पाहिला मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही
ही बातमी वाचा: