धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांत बिबट्याचा हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर, आता भूम तालुक्यात एका शेतकऱ्यावर बिबट्याने (Leopard) हल्ला केला असून सुदैवाने शेतकऱ्याचा जीव वाचला आहे. येथील जखमी शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूम तालुक्यातील (Bhoom) मात्रेवाडीत ही घटना घडली. रात्री शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याची झडप घातली होती.


सोमनाथ माने पिकाला पाणी देऊन झोपले त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, माने यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या भावाने टॉर्च लावल्याने उजेड दिसताच बिबट्या पळाला आणि त्यांचा जीव वाचला. भूम येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सोमनाथ माने यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बार्शीला हलवले. मात्र, या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, परंडा, भुम आणि कळंब तालुक्यात बिबट्याची दहशत कायम असल्याचे दिसून येते. धाराशिव जिल्ह्यात महिनाभरापासून बिबट्याची दहशत पाहायला मिळते. आज भूम तालुक्यातील मात्रेवाडीत पहाटेच्या दरम्यान शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. सोमनाथ माने असं बिबट्याने हल्ला केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्रीची वीज असल्याने पिकाला पाणी देण्यासाठी माने बंधू शेतात गेले होते. पाणी दिल्यानंतर पहाटेच्या वेळी झोपलेल्या सोमनाथ माने यांच्यावर बिबट्याने झडप घातली. सुदैवाने सोबत असलेल्या त्यांच्या भावाने टॉर्च लावल्याने उजेडात बिबट्या पळून गेला, त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. जिल्हाभरात तुळजापूर, परंडा, भूम आणि कळंब तालुक्यात बिबट्याची दहशत आहे.


बिबट्याच्या शोधासाठी 4 पथकं


दरम्यान, बिबट्याच्या आगमनाने वन विभागही अलर्ट झाला आहे. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाचे चार पथक तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यांना बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही. परंडा इथं शेळीवर बिबट्याने मारलेली झडप वनविभागाच्या कॅमेरात कैद देखील झाली आहे. दरम्यान, रात्री शेतात जाताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील वनविभागाने केलं आहे. 


हेही वाचा


लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी