मुंबई : विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्याच्या चर्चेनंतर वाद चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हेदेखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. B. R. Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा केला जातोय. त्यानंतर सत्ताधारी भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. आव्हाड यांचा निषेध केला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी माफी मागितली आहे, असे म्हणत भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे.     


छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?


जितेंद्र आव्हाड हे चांगल्या भावनेने महाडला गेले. त्यांनी चुकून फोटो फाडला. त्यांनी माफी मागितली आहे. मला वाटतं की आपण त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काहीही अर्थ नाही. आम्हाला शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे, या मुद्द्यावरून लक्ष विचलीत होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावरच लक्ष केंद्रीत होईल, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.


मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको


म्हणूनच माझी सर्वांना विनंती आहे की, बहुजन समाजातील तसेच दलित, ओबीसी, मराठा, ब्राह्मण, संपूर्ण महिला तसेचमनुस्मृतीला विरोध करणारे जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात चंचूप्रवेश नको यावर लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर आपले लक्ष भलत्याच ठिकाणी केंद्रीत होईल, असे म्हणत त्यांनीदेखील मनुस्मृतीच्या श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध केला. 


महाडमध्ये नेमकं काय घडलं होतं?


दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याला विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी थेट महाडला जाऊन आंदोलन केले. महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन ते तळ्यातील पाणी प्यायले तसेच तेथे मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. या आरोपानंतर आव्हाड यांनीदेखील माझ्याकडून हा प्रकार चुकून झाला, असे म्हणत त्यांनी त्याबद्दल जाहीर माफी मागितली. मात्र भाजपने हाच मुद्दा उचलून धरला आहे.  


हेही वाचा :


महाडच्या मनुस्मृती आंदोलनामुळे आव्हाड अडचणीत; शिवसेनेकडून अटकेची मागणी,भाजपनंतर वंचितही संतप्त


मोठी बातमी : चवदार तळ्यात ओंजळीने पाणी प्यायले, महाडमध्ये जाऊन मनुस्मृती जाळली, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल