रायगड : राज्य सरकारने विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेच्या काही भागाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मनुस्मृतीतील श्लोकांचाही वापर करण्यात येणार आहे. सरकारच्या याच निर्णयाला आता अनेक स्तरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जितेंद्र आव्हाड यांनीही या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे. त्यांनी आज (29 मे) थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


आव्हाड यांच्याकडून सरकारच्या निर्णयाला विरोध


जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचा थेट विरोध केला आहे. या निर्णयाचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांनी थेट भूमिका घेतली. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच आम्ही सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचे दहन करू, असे आव्हाड यांनी जाहीर केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. त्यामुळे मनुस्मृतीच्या अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करण्यासाठी आव्हाड यांनीदेखील हेच स्थान निवडले. 


ओंजळीने पाणी प्यायले, जय भीमच्या घोषणा


आव्हाड यांनी आज (29  मे) चवदार तळ्यावर जात आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच ओंजळीने चवदार तळ्याचे पाणी प्यायले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच 'जय भीम,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आव्हाड यांच्यासोबत मिलिंद टिपणीस आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


पोलिसांकडून आव्हाड यांना नोटीस


मात्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना महाड पोलिसांकडून आंदोलन रोखण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. कायदा आणि सुव्यव्यवस्था अबाधित राहावी, आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरीता ही नोटीस बजावली होती. मात्र आव्हाड यांनी या नोटिशीला धुडकावून लावत महाडच्या चवदार तळ्यावर मनुस्मृतीचे दहन केले. त्यामुळे पोलीस आव्हाड यांच्यावर काय कारवाई करणार, असे विचारले जात आहे.  


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?


अनेक समाज बांधवांनी एकत्र येऊन तेव्हा मनुस्मृतीला विरोध केला होता. मनुने स्त्रियांविषयी क्रोध, द्वेष, निंदा व्यक्त केलेली आहे. काही निवडक लोकं महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. एकीकडे संविधान बदलण्याचा कारनामा सुरू आहे, असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. 


मिलिंद टिपणीस काय म्हणाले?


पाठ्यपुस्तकात मनुस्मृती दाखविणे, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे हा आचारसंहितेचा भंग नाही का? अस्पृश्य समाजाला हीन वागणूक मिळाल्याने बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. ती प्रथा आता बंद झालेली असताना पुन्हा मनुस्मृती कशाला पाहिजे. पुढाऱ्यांना देशातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. सरकारला अभ्यासक्रमात संतांच्या अभंगांचा समावेश का करावासा वाटला नाही. तथागत गौतम बुद्ध हे सर्वात मोठे आहेत, त्यांच्याही विचारांचा समावेश होणे गरेजेचे होते. बहुजन तरुणाने या बाबतीत विचार करणे गरजेचे, असे मिलिंद टिपणीस म्हणाले.