कोल्हापूर : महापुरात मृत झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची मदत करणार तर केंद्र सरकार 2 लाख मदत करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावावर सात बारा असेल तर त्यांच्या नातेवाईकांना गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरु असलेल्या योजनेतून आणखी दोन लाख मिळणार असल्यांचही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील तसेच कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवारांनी कोल्हापूर शहरातील कुंभार गल्लीतील पूरपरिस्थितीचा आढावा घेत तिथल्या व्यापारांच्या व्यथाही ऐकून घेतल्या. 


पावसाळा संपल्यानंतर पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी एक समिती नेमणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. 
  
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "महाविकास आघाडीच्या वतीने सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. कोल्हापुरात पुरामुळं होणारे नुकसान टाळण्यासाठी 'बॉक्स टाईप' मोऱ्या बांधणार आहे."


अलमट्टीमुळे पूरपरिस्थिती नाही
अलमट्टी धरणामुळे कोल्हापुरला पुराचा धोका वाढलाय अशी चर्चा केली जाते. त्यावर दोन्ही राज्यांनी मिळून समन्वय साधला. अलमट्टीमुळे असा पूर येतोय का यासाठी गेल्या वेळच्या सरकारने एक समिती नेमली होती. त्या समितीच्या या अहवालामध्ये अलमट्टीमुळे पूर येत नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 


कोल्हापूर आणि सांगली शहराचे या पुरात मोठं नुकसान झालं आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस पडला असून काही ठिकाणी एकाच दिवसात 32 इंच पाऊस पडला असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "पावसाळ्यात पूर परिसरातील नागरिकांना तात्पुरते राहण्याची व्यवस्था करण्यावर विचार सुरु आहे. नदी पात्रात गाळ किती आहे, वाळू किती आहे हे पाहावं लागेल. भराव टाकून ब्रिज तयार करु नयेत असं नागरिकांनी सांगितलं आहे. नागरिकांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. नितीन गडकरी यांच्याशी बोलून महामार्गावर पाणी येऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे."


महत्वाच्या बातम्या :