मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार लवकरच मदतीची घोषणा करेल असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांचे जास्त नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या पूर परिस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम मदत जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवारांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. यावेळी शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे आदी नेते उपस्थित होते. 


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, "महाराष्ट्रात सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी घेईल." तसेच पुढे बोलताना माळीणमध्येही अशीच अवस्था झाली होती. सरकार आणि स्थानिक नेत्यांच्या मदतीनं माळीणला पुन्हा उभं करण्यात आलं, असंही ते म्हणाले. 


राज्यात उद्भवलेल्या पुरामुळं 16 हजार कुटुंब उद्ध्वस्थ झाली आहेत. तर चिपळूण, खेडमधील पाच हजार; रायगड महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसल्याची माहिती शरद पवार यांनी बोलताना दिली. पुढे बोलताना "राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचं वाटप करण्यात येईल. याशिवाय वैद्यकीय पथकं पाठवली जातील. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. 


नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये : शरद पवार 


राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बोलताना नेत्यांना पूरग्रस्त भागांचा दौरा न करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांत गेलंच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे? याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल."