Mumbai : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) एका ८० वर्षीय प्रवाशाचा इमिग्रेशन काऊंटरजवळ मृत्यू झाला होता. या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर पॅसेंजरच्या रूपात बुकिंग केली होती. परंतु त्यांना व्हिलचेअर मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) एअर इंडियाला (Air India) 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


16 फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाने पत्नीसोबत न्यूयॉर्क (New York) येथून एअर इंडियाच्या विमानात व्हिलचेअर पॅसेंजरच्या रूपात बुकिंग केली होती. न्यूयॉर्कहून तो प्रवासी मुंबईत आला होता. 11:30 वाजता येणारी फ्लाईट दुपारी 2:10 वाजता लँड झाली. या फ्लाईटमधील 32 प्रवाशांना व्हिलचेअरची गरज होती, मात्र एअर इंडिया केवळ 15 व्हिलचेअर उपलब्ध करू शकली होती. 


हदयविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू


विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे त्यांना एकच व्हीलचेअर असिस्टंट मिळाला. वयोवृध्द व्यक्तीने आपल्या पत्नीला त्या व्हीलचेअरवर बसवले आणि पायी चालायचे ठरवले. वृद्ध व्यक्ती सुमारे 1.5 किलोमीटर चालल्यानंतर इमिग्रेशन क्षेत्रात पोहोचली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मनुभाई पटेल असे मृत्य झालेल्या व्यक्तीचे नाव होते.  मृत ज्येष्ठ नागरिक हे अनिवासी भारतीय आणि अमेरिकेचे पासपोर्टधारक होते.


सहार पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद


दरम्यान, व्हिलचेअरच्या अधिक मागणीमुळे प्रवाशाला व्हिलचेअर असिस्टंट मिळेपर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी पत्नीसोबत चालण्याचा पर्याय निवडला, असे एअर इंडियाने म्हटले आहे. याप्रकरणी सहार पोलीस स्टेशनने या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली होती. नियमानुसार गरज पडेल तितक्या व्हिलचेअर उपलब्ध करणे ही विमान कंपनीची जबाबदारी आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका आता एअर इंडियावर बसला आहे. 


मागील महिन्यात इंडिगो एअरलाईनला ठोठावला दंड 


इंडिगो एअरलाईन (Indigo Airline) आणि मुंबई विमानतळ (Mumbai Airport) प्रशासनाला Bureau of Civil Aviation Security अर्थात BCAS नं दणका दिला. मुंबई विमानतळावर विमानाच्या शेजारीच बसून प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगोला 1 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. 14 जानेवारी रोजी गोवा-दिल्ली विमान गोव्याहून निघतानाच खूप लेट झालं होतं. त्यानंतर दिल्लीत धुकं होतं म्हणून विमान मुंबईला वळवण्यात आलं. हताश झालेले प्रवासी विमानाबाहेरच बसून गेले, आणि काहींनी तर तिथेच जेवण्यास सुरुवात केली. यावर कारवाई करत, BCAS नं इंडिगोवर वेळेत प्रवाशांची सोय न केल्याचा आणि परिस्थितीचं गांभीर्य न कळल्याचा ठपका ठेवला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या


उदय सामंत म्हणाले जागा शिवसेनेचीच, नारायण राणेंचा आक्रमक पवित्रा, रत्‍नागिरी-सिंधुदुर्गवरुन महायुतीत तिढा!


Nitesh Rane : संजय राऊतच बडगुजरांचे गॉडफादर, देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी