कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. गुन्हेगारीला निर्बंध घालण्यासाठी पोलिसांनी जनतेची मदत घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी भरघोस बक्षीसं जाहीर केली आहेत.
केडगाव शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर जामखेडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडात गावठी कट्ट्याचा वापर झाल्यानं, गावठी कट्टे पोलीसांच्या रडारवर आहे.
गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीसांनी दिला आहे. गावठी कट्ट्याची माहिती देणार्यांना रोख 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहिर केलं आहे.
शिवाय माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येणार आहे.
इतकंच नाही तर पोलिसांनी इतर गुन्ह्यांचा आणि अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्यासाठीही बक्षीसं जाहीर केली आहेत.
कोणती माहिती दिल्यावर किती बक्षीस?
- कट्टा - 25 हजार
- तलवार - चॉपर - 5 हजार
- मारामारी आणि दहशत करणाऱ्या गँगची माहिती - 5 हजार
- अवैध सावकारी - 2 हजार
- अवैध जुगार - मटका - 2 हजार
- अवैध दारु - 2 हजार
- गांजा, अफू चरस - 2 हजार
- फरार आरोपी - 5 हजार
- कुंटणखाना - 5 हजार
- मावा आणि सुगंधित तंबाखू - 5 हजार
एका महिन्यात दुसरं हत्याकांड
एका महिन्यात दुसर्यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडगाव पाठोपाठ आता जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या दुहेरी हत्याकांडाने नगर पुन्हा हादरुन गेलं आहे.
गोळीबारात राष्ट्रवादी युवकचा जिल्हा सरचिटणीस योगेश आणि राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही चुलत भाऊ होते. नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.
जामखेड मार्केट यार्डला काल साधारणपणे पावणे सात वाजता योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन समोरासमोर बेछूट गोळीबार केला.
सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डिजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न करताच हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले.
संबंधित बातम्या
नगर दुहेरी हत्याकांड : राजकीय बॅनर लावण्याच्या वादातून हत्या?
नगरला एका महिन्यात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची हाक
अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह भावाची हत्या