शिवाजी सहाणे राष्ट्रवादीत
स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या नाशिकच्या विधानपरिषद जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी सहाणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. शिवाय त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे शिवाजी सहाणे यांनी मागील निवडणूक ज्यांच्याविरोधात लढली त्याच पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली आहे.
शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सहाणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्याचा परिणाम म्हणून सहाणे यांची सेनेतून हकालपट्टी झाली.
त्यानंतर आता शिवाजी सहाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने, त्यांची लढत आता नरेंद्र दराडे यांच्याविरोधात असेल.
शिवसेना-भाजप युती
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजपचा 50-50 फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तीन जागांवर शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत, तर तीन जागांवर भाजप उमेदवार देणार आहे.
नाशिक, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार आहेत, तर उस्मानाबाद-लातूर-बीड, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून भाजप लढणार आहे.
21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल
स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे.
21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार
- विपुल बजोरिया - हिंगोली-परभणी
- नरेंद्र दराडे – नाशिक
- राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
भाजपकडून कोण?
उस्मानाबाद - लातूर - बीड मधून सुरेश धस, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली मधून भाजप प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे, तर अमरावतीतून प्रवीण पोटे पाटील यांचा अर्ज दाखल झाला आहे.
या आमदारांचा कार्यकाळ संपणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)
राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव (नाशिक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जानी दुर्राणी (परभणी-हिंगोली)
काँग्रेसचे दिलीपराव देशमुख (उस्मानाबाद-लातूर-बीड)
भाजपचे प्रवीण पोटे (अमरावती)
भाजपचे मितेश भांगडिया (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली)
संबंधित बातम्या
सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'
कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे