नांदेड : एबीपी माझाने पोलिस भरती घोटाळ्याचा पाठपुरावा केल्यानंतर, आता नांदेडपाठोपाठ पुण्यातही फेर लेखी परीक्षा होणार आहे.


पुणे राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 2 मधील लेखी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.  21 एप्रिल रोजी 83 जागांसाठी ही परीक्षा झाली होती. महत्त्वाचं म्हणजे इथेही एस एस जी कंपनीचे कंत्राट होते.



दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातही पुन्हा  लेखी परीक्षा होणार आहे. नांदेड पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी ही लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं. एकूण 1198 उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली होती. एकूण 71 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे.

आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत या लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रोख रक्कम घेऊन काही मार्क वाढविल्याचा आरोप आहे.

घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने एसआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानंतर आता परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे.

प्रवीण भटकरच्या एसएसजी या कंपनीकडे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम होतं. याचाच गैरफायदा घेत या कंपनीने उमेदवारांकडून पैसे उकळले आणि हा घोटाळा केल्याचं तपासात समोर आलं आहे.

नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा

नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. दोन पोलिस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.

संबंधित बातम्या :

नांदेड पोलिस भरती घोटाळ्यात 15 आरोपींना बेड्या

पोलिस भरती घोटाळा : ईटीएच कंपनी चौकशीच्या फेऱ्यात