अहमदनगर : गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने (coronavirus) थैमान घातले आहे. या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा पती तर कोणाच्या पत्नीला या कोरोनाने हिरावून घेतले आहे. तर अनेक मुलांवरील आई-वडिलांचे छत्रच कोरोनाने हिरावून घेतले आहे. असे असले तरी या महामारीत मदतीचेही अनेक हात पुढे आले. देशभरातील काही संस्थांनी कोरोनामुळे ज्यांचे आई-वडील मरण पावले आहेत अशा मुलांना दत्तक घेतले. असाच एक माणूसकी जपणारा उपक्रम राबवला आहे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावातील होशिंग कुटुंबाने.
नेवासा तालु्क्यातील सोनई या गावातील अनिल होशिंग यांचा मागच्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला. नूकतेच त्यांच्या मुत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने अमेरिकेत राहणाऱ्या अनिल होशिंग यांच्या अभिजीत होशिंग या मुलाने एक आदर्श उपक्रम राबला आहे. कोरोमुळे मृत्यू झालेल्या वडिलांचे वर्षश्राद्ध करताना केवळ धार्मिक विधी न करता ज्या शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वडील कोरोनामुळे मरण पावले आहेत अशांच्या मुलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील शिक्षणाला मदत करून होशिंग कुटुंबाने वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
अभिजीत होशिंग यांनी वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी कोरोनात विधवा झालेल्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याबाबत अभिजीत यांनी त्यांचे मामा हेरंब कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. त्यावरून रोख रक्कम देण्यापेक्षा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले तर पुढील उच्च शिक्षणाला उपयोग होऊ शकतो असे ठरवले.
याप्रमाणे कोरोना पुनर्वसन समितीचे नेवासा तालुका समन्वयक कारभारी गरड व अमित होशिंग यांनी या कुटुंबांशी संपर्क करून सोनई, नेवासा, बीड परिसरातील पाच गरजू विद्यार्थी निवडले. त्यांची पोस्टात कागदपत्रे पूर्ण केली व प्रत्येकी 10 हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आज वर्षश्राद्धाच्या दिवशी सकाळी घरगुती कार्यक्रमात अनिता होशिंग यांच्या हस्ते त्या पाच महिला व मुलांना देण्यात आले.
या मुलांना प्रमानपत्र देताना अभिजित होशिंग यांनी अमेरिकेतून सर्वांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी "वडील गमावण्याचे आमचे व या मुलांचे दुःख एकच असल्यामुळे त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी व अमित या मुलांच्या शिक्षणासाठी सतत पाठीशी उभे," राहू असे सांगितले.
या यावेळी मदनशेठ भळगट, प्रशांत कराळे, आप्पासाहेब वाबळे, रेणुका चौधरी, राहुल आठरे, के.एन. शिंदे, नगर जिल्हा समन्वयक अशोक कुटे, राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढूस, भारत आरगडे यांच्यासह होशिंग कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या
Mask : भारतात मास्कच्या वापरात घट ही चिंतेची बाब; कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता; निती आयोगाचा इशारा
कोरोनामुळे श्वसनाचे आजार वाढले; अवैध डास प्रतिबंधक अगरबत्त्या वापरणे थांबवा!