अहमदनगर: सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावे पाठवलेल्या स्फोटक पार्सलमध्ये एक चिट्ठी आढळली आहे.

मला तुम्ही जम्मूहून आणले, शिकवले, पायावर उभे केले, मी आभारी आहे. माझ्या आवाजात ते रेकॉर्ड केले आहे. ते ऐका, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याचंही समजतंय. मात्र, अशा प्रकारची कुठली चिठ्ठी आढळल्याच्या प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.

कुरियर पार्सलचा स्फोट

नगरच्या मारुती कुरिअर कार्यालयात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास कर्मचारी कुरिअर फोडायचं काम करत होते. मात्र त्यातील एक पार्सल फोडत असताना त्याचा अचानक स्फोट झाला.

या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे पार्सल अहमदनगरहून पुण्याला पाठवलं जात होतं. कुरियर कार्यालयात ज्या पार्सलचा स्फोट झाला, ते पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे होतं.

पुण्याला त्यांच्या नावे पाठवलं जाणारं पार्सल नगरच्या कुरिअर ऑफिसमध्येच फुटलं.

दरम्यान, हे पार्सल पाठवणाऱ्या संशयिताचं रेखाचित्र पोलिसांनी जारी केलं आहे. या पार्सलमध्ये क्रूड बॉम्ब असल्याचंही स्पष्ट झालं आहे. संजय नहार हे सरहद संस्थेचे प्रमुख आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांची संस्था काश्मीरच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करते.



संबंधित बातम्या

स्फोट झालेलं 'ते' पार्सल सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या नावे?

अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण जखमी