लातूरमध्ये पोलिसाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 22 Mar 2018 12:04 AM (IST)
लातूरमध्ये न केलेल्या अपघाताचे शुक्लकाष्ठ मागे लागल्याने एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लातूर : लातूरमध्ये न केलेल्या अपघाताचे शुक्लकाष्ठ मागे लागल्याने एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील तुपडी या भागात झालेल्या एका अपघाताप्रकरणी याच गावातील रिक्षाचालक राजू अभंगे याचं नाव गोवण्यात आलं होतं. यासाठी त्याच्याकडून पोलिसांनी पैशाची मागणीही केली होती. यामुळे हतबल झालेल्या राजूने काल (मंगळवार) दुपारी साडेचारच्या दरम्यान झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याच्याकडील सुसाईड नोटमधून या घटनेचा उलगडा झाला. या सुसाईड नोटमध्ये त्यानं स्पष्ट लिहलं आहे की, ‘पोलीस कर्मचारी जाधव यांनी पैशासाठी लावलेल्या तगाद्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.’ दरम्यान, याप्रकरणी पोलीस मुख्य दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप राजूच्या नातेवाईकांनी केला आहे. काही दिवसापूर्वी याच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बस स्थानकात झोपलेल्या एका वृद्धास मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आले आहे.