मुंबई: राज्य सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या मुद्द्यावरुन अनेकजण शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत आहेत. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) प्रकाश महाजन यांची भर पडली आहे. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, अशी टिप्पणी प्रकाश महाजन यांनी केली. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे, या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते. वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे. या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालय जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते. नरेंद्र मोदी यांना या लोकसभेला पुरेसं पाठबळ जनतेने दिलं नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीत मतं मिळाली नाहीत म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगूनचालन केले जात असेल तर ते योग्य नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला. पण मग हे सरकार हिंदूंची वळकटी करणार का?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही, असे महाजन यांनी म्हटले.
भाजप-मनसे युतीबाबत प्रकाश महाजन काय म्हणाले?
राज ठाकरे प्रेमाने चहा पाजतात. त्यामुळे अनेक जण राज ठाकरेंना भेटायला येतात. याचा अर्थ त्यांच्यासोबत आमची युती आहे असं नाही, असे वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मुसलमानांचे मतदान महायुतीला कमी झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असेल जेणेकरून आगामी काळात मुसलमानांची मत मिळतील. सरकार अशाप्रकारे हिंदुत्त्वाचे रक्षण कसे करत आहे, असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही: प्रकाश महाजन
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' नियतकालीकातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आले होते. याची चांगलीच चर्चा झाली होती. याविषयी प्रकाश महाजन यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, संघ आणि भाजप यांच्यातील आपसातल्या संबंधावर मनसेने बोलणे योग्य नाही.जर संघ असं बोलत असेल तर भाजपला आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. जर संघ टीका करत असेल इतर कोणी भाजपवर टीका करण्याची गरज नाही. संघाने जर भाजपला सल्ला दिला असेल तर तो सल्ला नसतो आदेश असतो, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
आणखी वाचा
डोळ्यात अश्रू, बोलण्यात संताप, केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; काय आहे नेमकं प्रकरण?
वक्फ बोर्ड जमीन घोटाळा; 35 हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप