Maharashtra Weather Update news : राज्याच्या विविध भागात सध्या पावसाचा (Rain) जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, आज राज्यातील हवामान (Weather) नेमकं कसं असेल? आज राज्यात कुठं कुठं पाऊस पडेल, याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं दिली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
हवामान अभ्यासक पंजबराव डखांचा अंदाज काय?
दरम्यान, हवामान अभ्यासक पंजबराव डख यांनी देखील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात 22 जून पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. या कालात महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडतच राहणार आहे. आज एका तालुक्यात तर उद्या दुसऱ्या तालुक्यात अशा तऱ्हेने पाऊस पडत राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. 15 जूनपासून ते 17 जून पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये पावसाची उघडीप देखील राहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. परंतू, या कालावधीतही विदर्भासह इतर भागात पाऊस सुरूच राहणार आहे. 15 जून पर्यंतच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डखांनी वर्तवली आहे.
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच फुलणार
राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस (Rain) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेती (Agriculture) कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यानं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच फुलणार आहे. चांगला पाऊस होताच शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं यावेळी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: