Someshwar Sahakari Sakhar Karkhana : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (Someshwar Sahakari Sakhar Karkhana) हा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला आहे. या कारखान्याने 2022-23 सालात गाळप झालेल्या ऊसाला 3 हजार 350 रुपयांचा दर जाहीर केलाय. गेल्या वर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडत राज्यात सर्वोच्च दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरलाय. कारखान्याच्या संचालक मंडळाची मासिक सभा पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आत्तापर्यंत सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना 2 हजार 900 रुपये मिळाले
मागील वर्षीच्या ऊसाला टनाला 3 हजार 350 रुपये दर देण्याचा अधिकृत निर्णय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या ऊसाला 2 हजार 846 रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला 54 रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना 2 हजार 900 रुपये अदा केले होते. आता सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना अजून टनाला 450 रुपये मिळणार आहेत. गेल्या हंगामात 12 लाख 56 हजार 768 मेट्रीक टनाचे गाळप केले होते.
साखरेला चांगला दर, वीज आणि डिस्टलरी प्रकल्पातून 50 कोटींचा नफा
ऊस दराच्या मुद्यासंदर्भात सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आमच्या कारखान्याचे नियोजन उत्तम आहे. मागील हंगामात आम्ही साडेबारा लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. चांगल्या दरानं साखरेची विक्री झाली आहे. निर्यातील चांगला दर मिळाला. त्यामुळं कारखान्याला अधिकचा नफा झाला. तसेच कारखान्यावर वीज निर्मिती केलीय. डिस्टलरी प्रकल्प सुरु आहे. यातून साखर कारखान्याला निव्वळ 50 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सर्वांसाठी एकच दर, यावर्षी साडेचौदा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
सोमेश्वर साखर कारखान्याची गेल्या सात ते आठ वर्षांची परंपरा आहे. आम्ही मेरीटवर दर काढतो. आम्ही कोणाची वाट बघत नसल्याचे जगताप म्हणाले. दरम्यान, सोमेश्वर साखर कारखाना हा फक्त सभासदांनांचं नाहीतर बिगर सभासदांना देखील 3 हजार 350 रुपयांचा दर देणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. सर्वांसाठी एकच दर असल्याचे जगताप म्हणाले. साखर कारखान्याने अनेक निर्बंध घातले आहेत. कारखान्याच्या गाड्या वापरणे कमी केलं आहे. खर्च टाळला आहे. आम्ही काटकसरीने कारभार करत आहोत. जास्तीत जास्त मोबदला शेतकऱ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पुरुषोत्तम जगताप म्हणाले. यावर्षीची एफआरपी ही 2 हजार 850 होती. पण आम्ही शेतकऱ्यांना अधिकचे 500 रुपये देण्याचे ठरवले आहे. आजच्या घडीला सोमेश्वर कारखाना राज्यातील सर्वोच्च दर देणारा कारखाना असल्याचे जगताप म्हणाले. यावर्षी कार्यक्षेत्रातील 12 लाख टन आणि बाहेरचा दोन ते अडीच लाख टन असा मिळून साडे चौदा लाख गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट असल्याचे जगताप म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: