Tanaji Sawant : धाराशीव (Dharashiv) जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी समजतो असे वक्तव्य राज्याचे आरोग्य आणि धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सांवत (Minister Tanaji Sawant) यांनी केलं. 11 हजार कोटी रुपये खर्च करुन उजनी धरणातून (Ujani Dam) सात टीएमसी पाणी सीना-कोळेगाव धरणात आणण्याची मंजुरी मिळालेली आहे. जून 2024 पर्यंत कोळेगाव धरणात हे पाणी येणार असल्याचा मला विश्वास असल्याचे सावंत म्हणाले.  या पाण्याचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, असा मला विश्वास आहे असे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी  सावंत म्हणाले.


अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी


संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे परांडा इथं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके आणि सर्व विभागातील जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यंत्रणांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्यासाठी शासनाने आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचनाही सावंत यांनी दिल्या. तसेच शासनाच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करावी. प्रत्येक योजनेचा शेवटच्या शेतकऱ्याला लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन तानाजी सावंत यांनी केले. शेतकरी आणि जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम करावे. झिरो पेंडन्सीचा अवलंब करून सर्व प्रलंबित कामे निकाली काढा अशा सचूना सावंत यांनी यावेळी दिल्या. 


योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका


प्रत्येक शासकीय योजना ही लोकांच्या कल्याणासाठी आखली जात असल्याचे मंत्री सावंत म्हणाले. योजना या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळं योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका. जर कोणी तशी मागणी करत असेल तर त्याची तक्रार करा असेही सावंत यावेलई म्हणाले. आपल्याला मिळणारा लाभ हा आपला अधिकार आहे. आपल्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी  'शासन आपल्या दारी ' या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली असल्याचे सावंत यांनी सांगितले. दरम्यान, परांडा इथं झालेल्या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग लाभार्थी योजना श्रावण बाळ योजना यांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य, महिला भगिनी आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


महत्त्वाच्या बातम्या:


आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांची औकात दाखवायची ताकद शिवसैनिकांच्या मनगटात; तानाजी सावंत यांचे वक्तव्य