Agriculture News : दूध दराच्या (Milk Price) मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेनं (Rayat Kranti Sanghatana) आक्रमक भूमिका घेतली आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Radhakrishna Vikhe Patil) यांनी गायीच्या दुधाला 75 तर म्हशीच्या दुधाला 125 रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दूध दराबाबत बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. 


दुधाच्या दरात मोठी घसरण 


शेतीला जोडधंदा म्हणुन दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले होते. दुधाला प्रतिलिटर 38 रुपये भाव मिळत होता, परंतु गेल्या दोन महिन्यात दुधाचे खरेदी दर टप्याटप्याने कमी होत 8 रुपयांनी कमी झाले आहेत. उन्हाळ्यात दूध उत्पादन (Milk Production) कमी होते आणि मागणी वाढते, त्यामुळे उन्हाळ्यात दुधाचे खरेदी दर (Milk Rates) वाढतात. या वर्षी मात्र दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे चाऱ्याचा खर्च वाढत असताना दुधाचे दर मात्र कमी होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 


22 मे रोजी दूध दराच्या प्रश्नावरुन काढली होती यात्रा


दूध दराच्या मुद्यावरुन सदाभाऊ खोत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देशी दारुच्या क्वार्टरच्या किंमती इतका दर शेतकऱ्यांच्या दुधाला द्या, अशी अजब मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गायीच्या दुधाला 75 तर म्हशीच्या दुधाला 125 रुपये प्रतिलिटर दर देण्याची मागणी खोत यांनी केली आहे. 22 मे रोजी दूध दराच्या प्रश्नावरून पुण्यामध्ये रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. याप्रश्नी दुग्धविकास मंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत दुधाच्या दरासंबंधित प्रश्न मांडण्यात येणार आहेत. 


यंदा दुधाचं उत्पादन 10 टक्क्यांनी घटलं 


या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. उन्हामुळे दरवर्षीप्रमाणेच यंदाही दुधाचं उत्पादन 10 टक्क्यांनी घटलं आहे. अलीकडच्या काळात पशुखाद्याचे दर प्रति 50 किलोला 200 रुपयांनी वाढले आहेत, तर गोळीपेंडीतही 50 किलोला 250 रुपयांपर्यत वाढ झालेली आहे. अन्य पशुखाद्याच्या दरातही वाढ झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी दूध आणि दुग्धजन्य पदार्थाला मागणी अधिक असते. यंदा पहिल्यांदाच उत्पादन कमी आणि दरही कमी झाले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुहेरी कोंडीत सापडले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Pune News: देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या , माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची अजब मागणी