Loan Apps Fraud Nashik : भारत सरकारने बनावट लोन अॅप्सवर जरी बंदी घातली असली तरी मात्र ही बंदी फक्त नावालाच आहे का ? अशा अॅप्सवर नियंत्रण नक्की कोणाचं ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण नाशिकमध्ये लोन अॅपच्या नावाखाली एका तरुणाला ज्या प्रकारे धमकावण्यात येऊन फसवणूक करण्यात आली आहे तो प्रकार बघून पोलीस देखिल चक्रावून गेले आहेत. काय घडलय नक्की बघुयात.


 विविध लोन अॅप्सवरून फसवणुक केल्याच्या एका प्रकारामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 3 लाख 89 हजार रुपयांच्या मोबदल्यात नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील महेश कदम या एका 28 वर्षीय तरुणाकडून तब्बल 17 लाख 12 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. पैशांची गरज असल्याने मोबाईलवर आलेल्या एका टेक्स्ट मेसेजवरून त्याने स्पेशल लोन अॅप डाऊनलोड करत सुरुवातीला 2160 रुपयांचे लोन घेतले. त्यानंतर महेशला विविध आमिष दाखवण्यात येऊन डिजीटल बँक, कॅश मोर, कॅश व्हॉलेट, ईजी लोन, फ्लॅश कॅश, हॅपी लोन, लोन मार्केट, फॅमिली लोन असे 8 अॅप डाऊनलोन करण्यास सांगत 3 लाख 89 हजार रुपयांचे लोन देण्यात आले. हळूहळू पंधरा दिवसात तर कधी सात दिवसात कर्जाची परतफेड करा असे मेसेजेस त्याला पाठवण्यात आले. मात्र ते करू न शकल्याने महेशचे फोटो अश्लील स्वरूपात मॉर्फ करण्यात येऊन कॉन्टॅक्ट लिस्टमधील नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्यात आले. 


महेश पैसे देत नसल्याचे बघून गुन्हेगारांनी त्याच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना त्रास देण्यास सुरुवात केली.  मित्रांना फोन तसेच व्हॉटस अॅपवर मेसेजेस करण्यात येऊन धमकवण्यात आले. इंटरनॅशनल नंबरवरून व्हॉटस अॅप कॉल करत महिला किंवा पुरुष... कधी हिंदी तर कधी मराठी भाषेत संवाद साधायचे. विशेष म्हणजे सायबर गुन्हेगार एवढ्यावरच थांबले नाही तर तुझ्या बहिणीचेही आम्ही तुझ्या फोटोप्रमाणेच अश्लील फोटो व्हायरल करू असे सांगण्यात येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळही महेशला करण्यात आली. 


एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे महेशची झोप उडाली आणि स्वतःसह कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून भितीपोटी महेशने आपल्या दोन दुचाकी, सोने आणि ईतर दागिने गहाळ ठेवत तसेच मित्रमंडळीकडून पैसे उसणे घेत कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या UPI ची लिंक देण्यात येऊन त्यावर फोन पे किंवा पे टीएम द्वारे पैसे भरण्यास त्याला सांगितले जात होते. अशाप्रकारे 4 एप्रिल 2023 ते 12 जून 2023 या दोन महिन्यांच्या काळात फोन पे च्या माध्यमातून 63 आणि पे टीएम द्वारे 77 व्यवहार करत 17 लाख 12 हजार रुपये त्याने कसेबसे जमा केले. मात्र जवळपास चारपट पैसे देऊनही धमकवण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने महेशने अखेर नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंद केला. या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस देखिल चक्रावले असून सायबर गुन्हेगारांचं हे एक मोठं जाळ असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 


पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास केला जातोय. मात्र अशा बनावट अॅपवर नियंत्रण नक्की कोणाचं हा प्रश्न आता उपस्थित होत असून कुठल्याही लिंकची किंवा अॅपची खात्री न करता लवकरात लवकर आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळवणे किती महागात पडू शकते, हेच यातून समोर आलेय. ऑनलाईन कुठलाही व्यवहार करताना किंवा आपली वयक्तिक माहिती देताना काळजी घ्या आणि सावध रहा.