मुंबई : अंगणवाडी सेविकांचा (Aganwadi Sevika) संप तूर्तास स्थगित करण्यात आला असून 26 जानेवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्याच पार्श्वभूमीवर  महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात 25 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरु असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी ही माहिती दिली आहे. 


या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळ मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलंय. तसेच कृती समितीच्या वतीने पेन्शन योजनेसंदर्भात देखील ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आलाय.


सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाप्रमाणे  ग्राच्युईटी देण्याचे मान्य केले असल्याची माहिती देण्यात आलीये. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार. संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार. संप काळात, करोना काळातील राहिलेल्या  दिवाळी आणि उन्हाळी  सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार. 10 वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलीये. 


चर्चा आशादायक - कृती समिती


ही सर्व चर्चा ही सचिव आणि आयुक्तांशी झाली असून आशादायक वाटल्याचं कृती समितीनं म्हटलं. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे दिलेल्या  आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्याचे अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येणार असल्याचं कृती समितीनं म्हटलं.


अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय?


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी घोषित करा
वेतनश्रेणी, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधीसह इतर लाभ द्यावेत
दरमहा 26 हजार रुपये मानधन देण्यात यावे
मदतनिसांना 20 हजार रुपये मानधन द्या
महागाई दुपटीने वाढते, म्हणून, दर सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी
सेवा समाप्तीनंतरच्या पेन्शनचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करा
अंगणवाड्यासाठी मनपा हद्दीत 5 हजार ते 8 हजार भाडे मंजूर करावे
आहाराचा दर बालकांसाठी 16 तर अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये करावा 


हेही वाचा : 


Ajit Pawar : वरिष्ठांनी निर्णय घेतलेला चालतो मग कनिष्ठांनी निर्णय घेतला की का नाही चालत? अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न