पुणे : मी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला नव्हता. आता अलिकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं मग भाजपसोबत सत्तेत गलं तर काय बिघडलं. वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत? असा थेट सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना विचरला. पुण्याच्या जुन्नरमध्ये शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला होता. त्याला पंधरा दिवस ही उलटले नाहीत, तोवर अजित पवार ही जुन्नरमध्ये शेतकरी मेळाव्याला उपस्थित झालेत. आजवर स्वतःला तटस्थ म्हणवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनकेंनी या मेळाव्याचे आयोजन केलं होतं. 


आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचे ही मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर आर आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तटस्थ मानले जाणारे आमदार अतुल बनके यांनी देखील अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच जुन्नर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा विधानसभा निवडणुकीत कायम फडकत राहील, असा शब्द देखील अतुल बेनके यांनी यावेळी दिलाय. 


अजित पवारांनी काय म्हटलं?


1991 ला मी खासदार झालो. कालांतराने मला राजीनामा द्यावा लागला. माझ्या जागी शरद पवार साहेब खासदार झाले, केंद्रात मंत्री झाले. मला राज्यात मंत्री करण्यात आलं. पुढं 1995 ला मी फक्त आमदार होतो, आघाडीचे सरकार त्यावेळी पडलं. 1999 साली परकीय व्यक्तीकडे आपल्या पक्षाचं नेतृत्व नसावं असं मत वरिष्ठांनी घेतलं. अगदी सहा महिन्यात आम्ही पुन्हा आमदार झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा परकीय नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेससोबत सत्तेत गेलो. मग सहा महिन्यात कुठं गेलं, परकीय व्यक्तीचं धोरण? आजवर शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि भाजपचे ही मुख्यमंत्री झाले. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याची संधी का येत नाही? आर आर आबा, छगन भुजबळ असे अनेक मातब्बर नेते आपल्याकडे होते. त्यापैकी कोणाला ही मुख्यमंत्री करता आलं असतं, मी काय माझा हट्ट धरला नव्हता. आता अलीकडेच शिवसेनेसोबत सत्तेत गेलो, ते चालतं मग भाजप सोबत सत्तेत गेलो तर काय बिघडलं. वरिष्ठांनी निर्णय घेतला की चालतो, कनिष्ठांनी घेतला की का नाही चालत, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. 


रोहित पवार पाणी पळवत होते - अजित पवार


चासकमान, भामा आसखेड आणि डिंभे धरणासाठी खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. रोहित पवार पाणी पळवत होते. म्हणजे  धरणं उशाशी आणि कोरड घशाशी. मग हे दिलीप वळसे आणि अतुल बेनके कसं काय खपवून घेतील. जनतेने काय यासाठी त्यांना निवडून दिलंय का? मतदारांचे प्रश्न सोडवायचे सोडून ते त्या मतदारांना कसं काय संकटात टाकतील, असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. 


माझ्यावर खोटे आरोप झाले - अजित पवार


माझ्यावर सत्तर हजार कोटींचा आरोप करण्यात आला. 1960 पासून जलसंपदा विभागात 45 हजार कोटींची खर्च झाला आणि माझ्या काय आरोप झाला, की मी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. धादांत खोटा आरोप होता, हे पुढं सिद्ध झालं, असंही अजित पवार म्हणालेत.  कांद्याचा प्रश्न आपल्या समोर आवासून उभा आहे. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो. सोलापूरमध्ये ते आले तेव्हा मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री असं तिघांनी मोदींना हा प्रश्न काय आहे, हे सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 


हेही वाचा : 


NCP MLA Disqualification Case : शरद पवारांच्या परवानगीने अजित पवारांनी शपथ घेतली होती, राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीदरम्यान सुनील तटकरेंचा दावा