Maharashtra Reduced VAT : केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या नवे दर
जाणून घ्या नवे दर
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर देशात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही दर कमी करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे महाराष्ट्रातील दर आणखी खाली येणार आहेत. राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील वॅटमध्ये अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रति लीटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर
व्हॅट कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. पेट्रोल प्रतिलिटर 2 रुपये 8 पैसे कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.
राज्याच्या तिजोरीवर 2500 कोटी रुपयांचा भार
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीचे वार्षिक 2,500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. व्हॅट कमी केल्यानंतर पेट्रोलच्या विक्रीतून मिळणारा मासिक महसूल 80 कोटी रुपयांनी कमी होईल, तर डिझेलच्या विक्रीतून मिळणारा महसूल 125 कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त
केंद्र सरकारनं इंधनांच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) लागू करण्यात आले. केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरांत घट करण्यात आल्यानंतर देशभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेल (Diesel Price) स्वस्त झालं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).