कोल्हापूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दौरे, सभा, बैठका, पक्षप्रवेश अशा घडामोडींना वेग आला आहे. अशातच यावेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेकदा चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या, त्यावर याआधी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली होती, मात्र आज पुन्हा एकदा शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा आता विचार करण्याचं काहीच कारण नाही असं म्हटलं आहे. 


मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा संख्याबळावरती होईल असंही शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलेलं आहे. १९७७ मध्ये सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर मुरारजी यांचं नाव समोर आलं होतं. स्थिर सरकार देणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं देखील शरद पवार यावेळी बोलताना म्हणालेत. 


शरद पवार नेमकं काय म्हणालेत? 


मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं, नेतृत्त कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. अद्याप कशाचा काही ठरलेलं नाही. बहुमत नाही, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, यात काही शंका नाही, पण आत्ताच काही निर्णय घेण्याची आवश्कता नाही, असंही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले आहेत. 


यावेळी शरद पवारांनी एक उदाहरण देखील सांगितलं आहे, १९७७ साली आणिबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढं केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं, आणिबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वजण एकत्र आले, त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं, निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठेही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्कता नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्याला देऊ असं शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी म्हटलं आहे. 


"राज्यात आमची सत्ता येईल असे चित्र आहे. मात्र याचे नेतृत्त्व कोण करणार यावर अजूनही चर्चा झाली नाही. त्यामुळे आम्ही याचा निर्णय निवडणूक झाल्यानंतर घेणार आहोत, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान महाविकास आघाडीत एकीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी आग्रही आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस मात्र याबाबत काहीच बोलत नसल्याचं चित्र आहे.