कोल्हापूर: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्या जयदीप आपटे याचा या क्षेत्रातील अनुभव मर्यादित स्वरुपाचा होता. त्याने एवढं मोठं काम कधी केल्याचे दिसत नाही. असं असतानाही त्याच्यावर इतकी मोठी जबाबदारी कशी काय टाकण्यात आली? जयदीप आपटेच्या (Jaydeep Apte) एकंदरित कामाचा दर्जा पाहता त्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसते, असे वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या (Shivaji Maharaj Statue) दुर्घटनेवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आणि इतर काहीजण पुतळा पडण्यासाठी वाऱ्याचा वेग कारणीभूत असल्याचे सांगत आहेत. पण स्पष्ट सांगायचं झालं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मुंबईत इंडिया गेटनजीक शिवाजी महाराजांचा पुतळा 1960 साली उभारण्यात आला होता. त्याला काही झालेलं नाही. शिवाजी पार्कमध्येही शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तिकडेही मागच्या बाजूला समुद्र आणि समोर मैदान आहे. त्यामुळे पुतळा पडण्यासाठी वाऱ्याच्या वेगाचे जे कारण सांगितले जात आहे, ते अयोग्य असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
या पुतळ्याचे काम ज्याला देण्यात आले होते, त्याचा अनुभव मर्यादित होता. त्याला अशाप्रकारचं काम देणं योग्य नव्हतं. शेवटी घडायचे ते घडले. यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या, असे शरद पवार यांनी म्हटले. महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. तो तयार करण्यासाठी कुणाला काम दिलं, त्यात भ्रष्टाचार झाला. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत असे वागले जाते. सरकारची ही भूमिका राज्यातील लोक सहन करणार नाहीत, असेही शरद पवार यांनी म्हटले.
सूरत लुटीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावर पवारांचं भाष्य
छत्रपती महाराजांनी सूरत लुटली नव्हती. लूट हा शब्द काँग्रेसने आपल्या तोंडी घातला, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले होते. याबाबत शरद पवार यांनी भाष्य करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळं विधान केलं आहे. त्यामधून ध्वनित होते की, सूरतेची अशाप्रकारे लूट करण्याचं काम छत्रपतींनी केलं नव्हतं. चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जात आहे, असे फडणवीसांनी म्हटले.
याबाबत वास्तव चित्र मांडायाचा अधिकार ज्यांचं आयुष्य इतिहास संशोधन करण्यात गेलं आहे, त्यांचा आहे. जयसिंगराव पवार यांनी कालच सांगितले की, शिवाजी महाराजांनी सूरतेवर एकदा नव्हे दोनदा स्वारी केली. पण त्याचा उद्देश वेगळा होता. इंद्रजीत सावंत इतिहास अभ्यासक आहे, त्यांनीही जयसिंगराव पवार यांच्या मताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे साहजिक अपेक्षा आहे की, खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये, चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजात गैरसमज निर्माण होतात, असे शरद पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा