Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा अचानक रद्द झाला आहे. औरंगाबादला जाण्यासाठी आदित्य ठाकरे हे मुंबई विमानतळावर पोहोचले होते. पण अचानक पुन्हा ते मातोश्रीवर पोहोचले आहेत. दौरा का रद्द झाला याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. आज दिवसभरासाठी आदित्य यांचा औरंगाबादच्या दौरा होता, त्यात ते वेगवेगळ्या विकासकामांना भेटी देणार होते.


औरंगाबादच्या विविध एमआयडीसी आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर म्हणजे डीएमआयसीमध्ये विदेशी गुंतवणूक वाढावी, यासाठी आज ऑरिक हॉलमध्ये विदेशी गुंतवणूक आणि पर्यटनावर 'ऑरा ऑफ ऑरिक परिषद' सुरु झाली आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह विविध 7 देशांचे राजदूत उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी दुपारी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित राहणार होते. पण अचानक आदित्य याचा हा दौरा रद्द झाला आहे.  


आजच्या या परिषदेला सिंगापूर, स्विडन, जर्मनी, कोरिया, इस्राईल, नेदरलँड, रशिया या देशांचे 10 राजदूत उपस्थित आहेत. या परिषदेच्या माध्यमातून औरंगाबादच्या शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी आणि डीएमआयसीमध्ये ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रॉनिक्स, फूड प्रोसेसिंग आणि टेक्स्टाईल उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी चालना मिळण्याची आशा आहे. सध्या हायटेक शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीमध्ये उद्योजकांना गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे. कोरोना महामारीमुळं दोन वर्षे गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. आता हळूहळू उद्योगांना आणि उद्योगातील गुंतवणूकीला गती मिळू लागली आहे. त्यामुळं विदेशी उद्योगांच्या गुंतवणूकीसोबतच पर्यटन उद्योग वाढावा, यासाठी सरकारच्या वतीने पाऊल टाकलं गेलंय.


आदित्य ठाकरे यांचे दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी चिखलठाणा विमानतळावर आगमन होणार होते. त्यांनतर ते दीड वाजता ऑरिक सिटी येथील आयुर्वेद उत्पादन निर्मिती प्रकल्पास भेट देऊन पाहणी करणार होते. त्यांनतर दुपारी 2.40 वाजता ते औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी करणार होते. तसेच दुपारी 3 वाजता ते वेरुळ लेण्यांकडे जाणार होते. 4 वाजता वेरुळ लेणी परिसरात पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्याबात पाहणी करुन पुन्हा 6.15 वाजता मुंबईकडे रवाना होणार होते.


महत्त्वाच्या बातम्या: