Vikram Gokhale controversy : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. विक्रम गोखले यांनी केलेले हे वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बलिदानावर प्रश्न करणारे असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी म्हटले.
केंद्रातील भाजप नेत्यांना खूष करून पुढील वर्षी पद्मश्री मिळेल यासाठी विक्रम गोखले यांच्याकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला. जर स्वातंत्रवीर सावरकरांनी देशासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपण स्वातंत्र्यासाठी लढताना दिसलो असतो. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला 'भिके'ची उपमा देऊन त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कुठल्याही कलावंताला अधिकार नाही असेही त्यांनी म्हटले. जर त्यावेळेचं स्वातंत्र्य 'भीक' होती तर इतक्या स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य पत्करायची काय गरज होती?. जर 2014 पूर्वी स्वातंत्र्य मिळालं नसतं तर गोखले चित्रपटाऐवजी एखाद्या इंग्रजांच्या घरी काम करताना दिसले असते अशी टीका बाबासाहेब पाटील यांनी केली. विक्रम गोखले यांचा चित्रपट क्षेत्रातील प्रवास हा 2014 च्या किती तरी पूर्वीचा आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर स्वातंत्र 2014 नंतरचे आहे. तर 2014 पूर्वीचा त्यांचा चित्रपटातील यशस्वी प्रवास हा गुलामगिरीतला आहे का? जर गुलामगिरीतला असेल तर त्यावेळेस त्यांचे स्वतंत्र्यासाठी काय योगदान आहे? असा प्रश्नही बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला.
ज्या स्वातंत्रवीरांनी या देशासाठी 1947 पूर्वी खूप हाल-अपेष्टा व वेळप्रसंगी बलिदान दिलं आहे अशा स्वातंत्र्यवीरांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट विभागाने म्हटले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात. मात्र, एखाद्याची चमचेगिरी करण्यासाठी स्वातंत्र्यला भिकेची उपमा देणे कितपत योग्य आहे असा प्रश्नही त्यांनी केला आहे. स्वातंत्र्याचा अभिमान बाळगून अशा प्रकारचे भाष्य करणे कलावंतांनी टाळणे गरजेचे आहे", असे मतही राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
संबंधित वृत्त:
महागाई काय मोदींनी वाढवली; विक्रम गोखले यांचा उलट प्रश्न
स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha