अमरावती : माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होतीय
अमरावतीमध्ये मागील तीन दिवस झालेल्या हिंसाचारानंतर आज संचारबंदी (Amravati Curfew) लागू करण्यात आली आहे. त्रिपुरातील घटनेनंतर शुक्रवारी काही संघटनांनी काढलेल्या मोर्चात तोडफोड करण्यात आली. आता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपनं काल (14 नोव्हेंबर) अमरावती जिल्हा बंदची हाक दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, हिंसाचाराबाबत वेगवेगळ्या अफवा पसरत असल्यानं जिल्ह्यातील इंटरनेट सेवाही तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
अमरावती, नांदेड आणि मालेगावात घडलेल्या हिंसाचारावरुन राष्ट्रवादीनं भाजपवर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी तीन शहरात दंगली घडवण्याचं षडयंत्र भाजपनं रचलं असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आहे. यामागे भाजप नेते अनिल बोडेंसह अनेक नेत्यांचा हात आहे असा आरोपही मलिकांनी केला आहे.
संचारबंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळता इतर कारणासाठी घराबाहेर पडणार नाही. तसेच, पाचपेक्षा जास्त इसम एकत्रित जमणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नये. तसेच या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल. हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहरासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
संबंधित बातम्या :
विनाकारण घराबाहेर पडू नका! संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 गुन्हा भविष्यात अडचणीचा ठरणार
Amravati violence Update : अमरावतीत बंदला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha