veteran actor Vikram Gokhale controversial statement : महागाई काय पंतप्रधान मोदींनी वाढवली का, असा उलट प्रश्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी केला. पुण्यात 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महागाईवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम गोखले यांनी हा उलट प्रश्न केला.
विक्रम गोखले यांनी महागाईच्या प्रश्नावर म्हटले की, अनेकजण हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. ओपेकमध्ये तेलाचे दर किती झाले हे माहित आहे का, एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का, अशा वेळी त्याच्या पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले.
कंगनाच्या वक्तव्याला पाठिंबा
अभिनेत्री कंगना रनौतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केले. सन 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. कंगना जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचे, कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.
देश कधीही हिरवा होणार नाही
लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. असेही वक्तव्य गोखले यांनी केले.
नेमकं चाललेय काय?
राजकीय वर्तुळात परिस्थिती गंभीर झालेली आहे, कोणाची नावं घेत नाही. ब्राह्मण समाजवरती टीकेची झोड उठवणे, मराठा आणि ब्रह्मणांमध्ये मतभेद निर्माण करणे काय चाललंय हे? कुणबी, क्षत्रिय हे सर्व माझे आहेत. दलितांना दलित म्हणणे मला पटत नाही. देशाचा इतिहास बाबरापासून सुरु होतो तो आणि छापला जातो हे दुर्देव आहे. बाबरापूर्वी कोणी नव्हते का? या देशाकरिता झटणारा हा माझा मुसलमान आहे, त्यात मी भेदाभेद करत नाही. माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाहीत, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
संबंधित वृत्त:
स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली, विक्रम गोखलेंकडून समर्थन
कंगना पुन्हा बरळली: पद्मश्री पुरस्कार पुन्हा करते, पण...