UP Election 2022 Yogi Adityanath Chandragupta Maurya Statement : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमधील राजकारण तापलं आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकांकडून प्रचारसभांना वेग आलाय. उत्तर प्रदेश निवडणुकीत जिन्ना यांच्यानंतर सम्राट चंद्रगुप्त मौर्य (Chandragupta Maurya) यांच्या नावाचीही एन्ट्री झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना इतिहासात योग्य न्याय न दिल्याचं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी समाचार घेत इतिहास वाचण्याचा सल्ला योगींना दिलाय. तसेच अखिलेश यादव यांनीही भाजपला इतिहास वाचण्याचा सल्ला दिलाय. अखिलेश यादव यांनी जिन्ना यांच्याबाबत वक्तव्य करत वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. योगींच्या वक्तव्याचा समाचार घेताना ओवेसी यांनी हल्लाबोल केलाय. हिंदुत्व तर बनावट इतिहासाची फॅक्ट्री आहे, असं म्हणत ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चंद्रगुप्त मौर्य यांच्याबाबत वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. रविवारी लखनौमध्ये एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, ‘इतिहासात सम्राट अशोक किंवा चंद्रगुप्त मौर्य यांना महान आहेत असं सांगितलं गेलं नाही मात्र चंद्रगुप्त मौर्य यांच्याकडून पराभूत झालेल्या सिकंदरला महान असल्याचं म्हटलं गेलं. इतिहासकार या मुद्द्यांवर मौन आहेत कारण यामागचं सत्य भारतासमोर येईल आणि भारतीय नागरिक पुन्हा या विरोधात उभा राहतील.’
इतिहास लिहिणाऱ्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांना न्याय दिला नाही, या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. तसेच त्यांच्या इतिहासाच्या माहितीवर प्रश्न उपस्थित केलाय. तसेच योगी आदित्याथ यांना ओवेसी यांनी इतिहास वाचण्याचा सल्ला दिलाय. हाच सल्ला भाजपला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही दिलाय. एमआयएमचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हिंदुत्व एक बनावट इतिहासाची फॅक्ट्री आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्जेंडर कधीही लढले नाहीत. त्यांच्यात कधीच युद्ध झालं नाही. जर कुणी यांच्यात युद्ध झालेय असं म्हणत असेल तर आपल्याला चांगल्या एज्युकेशन सिस्टमची गरज का आहे? हे समजेल. बाबा लोक आपल्या मनाने काहीही तथ्य आपल्यावर लादतात. बाबा शिक्षणाला महत्व देत नाहीत, त्यांच्या वक्तव्यावरुन ते स्पष्ट दिसतेय.