पालघर : भाईंदर येथील वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. ते काल डहाणू न्यायालयात जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या सोबत प्रवास करणारी त्यांची सहकारी गंभीर जखमी झाली आहे. त्रिवेदी हे (एम एच 04 एच एम 1704 क्रमांकाच्या) कारने येत असताना कारवरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली.
दरम्यान, गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आरोपींची संख्या आता 141 झाली आहे. त्यातील 9 अल्पवयीन आरोपींच्या संख्येत आता 1 ने भर पडली आहे. एकूण 10 जण आता भिवंडी येथील बाल सुधार गृहात आहेत. आज खूनाच्या 6 नव्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 19 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
आधीच अटकेत असलेल्या 106 जणांपैकी 5 जणांना न्यायालयाने 16 मे पर्यंत पोलिस कोठडी दिली असून, उर्वरीत 101 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले असले तरी त्यातील 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात (आरोपींना अटक करताना हल्ला करणे) अटक करण्यात आली असून त्यांना 18 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. त्या शिवाय 19 आरोपी आधीच पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहेत.
पालघर प्रकरणाचा तपास CBI अथवा SIT मार्फत करावा; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरातमधील सुरतला दोन साधू आणि त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असे तिघेजण निघाले होते. महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले या गावी ते आले. कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ असलेल्या वन विभागाच्या चौकीजवळ गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तेथील ग्रामस्थांनी गाडी रोखून गाडीमधील त्यांना मारहाण सुरू केली.
ही बाब कासा पोलिसांना रात्री दहा वाजता समजल्यानंतर पालघर जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ चौधरी व कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सुमारे वीस-पंचवीस पोलीस कर्मचारी घटनास्थळी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोहोचले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या या तिघांना पोलीस वाहनांमध्ये ठेवल्यानंतर मोठ्या संख्येत असलेल्या जमावाने पोलीस वाहनावर देखील जबर दगडफेक करून पोलिसांनाही पळवून लावले. त्यानंतर दगड, काठ्या व इतर साहित्याने मारहाण करत चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची अमानुषपणे हत्या केली.
हेही वाचा-#पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी
पालघर हत्याकांडात पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर
Updated at:
14 May 2020 12:47 PM (IST)
पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आरोपींची संख्या आता 141 झाली आहे.
मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी येत असताना झालेल्या अपघातात वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मृत्यू झाला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -