मुंबई : पालघर जिल्ह्यातील झुंडबळी हत्याकांडाची केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयमार्फत किंवा विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच चौकशीत न्यायालयाने जातीने लक्ष द्यावे आणि तपास यंत्रणेकडून ठराविक कालावधीनंतर तपासाचा अहवाल मागवत हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून चोर समजून गुजरातमधील सुरत इथं एका अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि वाहन चालकाची निघृण हत्या करण्यात आली होती. याविरोधात दिल्लीतील अॅड. अलख आलोक श्रीवास्तव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी जमावाकडून पीडितांना वाचविण्यासाठी कोणतेही सहकार्य अथवा मदत केली नाही. या घटनेच्या एका व्हिडिओमध्ये पोलीस अधिकाऱ्यानं पीडित साधूचे जमावापासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे सदर घटनेची चौकशी सीबीआय किंवा एसआयटीमार्फत करण्यात यावी. राज्य पोलीस दलाऐवजी अशा विशेष यंत्रणाकडून निष्पक्ष पद्धतीनं या प्रकरणाची चौकशी करणं योग्य ठरेल. तसेच घटनेत जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटूबियांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे. राज्य सरकारनं या घटनेची गंभीर दखल घेत या घटनेनंतर शंभरहून अधिक संशयिंताना अटक करण्यात केली आहे. तर कासा पोलीस स्थानकातील दोन पोलीसांना निलंबितही करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीआयडेकडे वर्ग करण्यात आली आहे.


पालघर हत्याकांड | गृहमंत्री म्हणाले, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, आरोपींची नावं जाहीर


काय आहे प्रकरण?
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या  चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतल असून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.  पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न व इतर कलमे लावण्यात आली आहेत.


Palghar mob lynching | Anil Deshmukh | पालघर हत्याकांडाचा संपूर्ण तपास सीआयडीकडे, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद