Solapur Accident : कर्नाटकातील विजयपूर हुबळी महामार्गावरील जुमनाळ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. फॉर्म्युनर गाडीतून माजी सरपंच चिदानंद सुरवसे, संदीप विठ्ठल पवार, चालक सोमनाथ काळे आणि विजय अंगडी हे चौघे सोलापूरकडे निघाले होते.
विजयपूरपासून जवळपास 14 किमी अंतरावर असलेल्या जुमनाळ गावाजवळ समोरून येणाऱ्या एसटी बस आणि फॉर्च्यूनर गाडीची जोराची धडक झाली. यात कारमधील चार जण जागीच ठार झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. एसटी बस आणि फॉर्म्युनर गाडीची समोरासमोर धडक बसल्यानंतर फॉर्म्युनर गाडी पलटी झाली. यामुळे चौघेही गाडीखाली अडकले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागला अशी माहिती मिळाली.
अपघातानंतर हुबळी विजयपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. चारही मृतदेह आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली. चिदानंद सुरवसे यांचे व्यावसायिक कामानिमित्त नेहमीच कर्नाटकात जाणे-येणे होते. नांदणी येथील चेकपोस्टचा त्यांच्याकडे ठेका असल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील वाहतूक व्यवसायाशी त्यांचा सातत्याने संपर्क असायचा. याच निमित्ताने ते कर्नाटकात गेले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला.
मृत चिदानंद सुरवसे हे नांदणी गावचे पाच वर्षे सरपंच होते. गावसह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील त्यांचे चांगले प्रस्थ होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अपघातात मृत्यू झाल्याचे कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अपघाताची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी विजयपूरकडे धाव घेतली. मृतांवर विजयपूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :