अहमदनगर : लोकांचे घर बांधण्यासाठी सेन्ट्रिग काम करणाऱ्या पतीचं कोरोनामुळे निधन झालं आणि शिंदे कुटुंबावर आभाळ कोसळलं. राहण्यासाठी घर नाही, हलाखीची परिस्थिती आणि 2 मुलींची जबाबदारी. अशा परिस्थितीत हेरंब कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने एकल समितीच्या माध्यमातून सोशल मीडियावरून आवाहन केलं आणि काही महिन्यात दीड लाख रुपये जमवत शिंदे कुटुंबाला नवीन घर बांधून दिलं. सोशल मीडियाचा योग्य उपयोग केल्यास एखाद्याच जीवन बदलू शकते हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.
कोरोनामुळे कांचन शिंदे यांनी आपला पती गमावला. दोन लहान मुलींची जबाबदारी आणि त्यात फ्लेक्सच्या कागदांच्या पडद्यात राहणाऱ्या तिचे दुःख बघून हेरंब कुलकर्णी आणि त्यांच्या एकल समितीच्या ग्रुपने तिला घर बांधून देण्याचा निर्धार केला व व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केलं आणि बघता बघता गावाच्या मदतीने लोकवर्गणीतून तिचे दीड लाख रुपयांचे घर उभे राहिले. या घराचं हस्तांतरण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राहीबाई पोपरे यांनी कांचन हिच्या हातात घराची किल्ली दिली व सर्वांच्या साक्षीने घराचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
'कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती' अकोल्यात स्थापन झाली. त्या समिती कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन कोरोना विधवांना भेटी दिल्या. कांचन शिंदे यांच्या घरी भेट दिली तेव्हा ती आणि तिच्या दोन लहान मुली केवळ फ्लेक्सचे पडदे लावून राहत होती. घराच्या भिंतीही उघड्या होत्या. ते बघितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या महिलेला घर बांधून द्यायचे ठरवले. आणि लोकवर्गणीतून दीड लाखाचे घर उभे करून दिले असल्याची भावना हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
फ्लेक्स लावून घरात राहणाऱ्या कांचन शिंदे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आंनद पाहून सर्वांना समाधान मिळाले. माझा पती जरी आज नसला तर मला अनेक भाऊ आज मिळाले असून माझ्या मुलींसाठी आता भविष्यात कष्ट करुन मुलींना पायावर उभं करायचं आहे, असा विश्वास कांचनने बोलून दाखवला.
कोरोना विधवांसाठी अकोल्यातून सुरू झालेली ही चळवळ राज्याला दिशा देणारी असून सरकारी मदतीवर अवलंबून न राहता हेरंब कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली मदत अभिमानास्पद आहे हे मात्र नक्की. एकीकडे सोशल मीडियामुळे दंगली भडकतानाच चित्र असताना दुसरीकडे सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास एखादं जीवन बदलू शकते हेच यावरून सिद्ध होतं.