Pune Accident:पुण्यातील अपघाताचं सत्र सुरुच असून वाघोलीत झालेल्या भीषण अपघातानंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकीजवळील विसावा हॉटेलजवळ झाला. नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, लक्झरी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ मदत कार्य सुरू करून भिगवण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या घटनेने महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.


जखमींच्या स्थितीवर लक्ष


महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कार्यवाही केली.अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात असून, पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अपघात ट्रक आणि बसच्या वेगाच्या तफावतीमुळे झाला असावा.या अपघाताने पुणे-सोलापूर महामार्गावर सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.


वाघालीत डंपरने 9 जणांना चिरडले


पुणे शहरातील वाघोली केसनंद परिसरामध्ये रविवारी रात्री भीषण अपघात (Pune Wagholi Accident) झाला होता. अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले. ही घटना ताजी असतानाच वाघोलीत सलग दुसऱ्या दिवशी डंपरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीत ⁠हायवा डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ⁠साईराज देशमुख असे या जखमीचे नाव आहे. वाघोलीतील वाघेश्वर मंदिर या ठिकाणी अपघात झाला. काल वाघोलीत केसनंद फाट्यावर एका डंपरने नऊ जणांना चिरडल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी  डंपरचा अपघात झालाय. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 

नऊ जणांना चिरडल्याप्रकरणी डंपर चालकाला पोलीस कोठडी


दरम्यान, वाघोलीमध्ये डंपरने ९ जणांना चिरडल्याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अपघाताप्रकरणी डंपर चालक गजानन तोटरे याच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची शासकीय मदत, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार आहे.