बसवकल्याण (कर्नाटक) : कर्मकांड, जुनाट रुढी, परंपरा आणि प्रथा यावर आसूड ओढण्याचं मोठं काम आपल्या संतांनी केलं. त्यांनी प्रसंगी अख्ख्या जगाचा विरोध पत्करला. अन्याय, अत्याचार सहन केले. त्यातलंच एक नाव म्हणजे महात्मा बसवेश्वर.

आज त्या महात्मा बसवेश्वर अर्थात बसवराज मादीराज मंडिगे यांची जयंती आहे. पण आता लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे निघत आहेत. दुसरीकडे लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म नसल्याचं विरशैव मंडळीचं मत आहे. या घुसळणीत ‘एबीपी माझा’नं लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे.

बसवकल्याणच्या 108 फुटी उंच पुतळ्याहूनही कानडी माणसाच्या मनात बसवेश्वरांची प्रतिमा उत्तुंग आहे. एका राजाचा प्रजादक्ष, लोकहितकारी, समाजसेवक महामंत्री अर्थात महात्मा बसवेश्वर.

बसवराज मादीराज मंडीगे हा महामानव १२ व्या शतकात होवून गेला. या लोकसंसदेन ब्राम्हण मुलगी आणि चांभार मुलगा यांचं लग्न लावून दिलं. ही लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन प्रवासाची सत्य कथा आहे.

राजा बिज्जल यांच्या किल्ल्यातून बसवेश्वरांच्या समाजकार्याची सुरुवात होते. या किल्ल्यातच बसवेश्वरांचं निवासस्थान असावं. ही बसवेश्वरांनी जगातल्या पहिल्या लोकसंसदेची सुरुवात केली.  ही लोकसंसद ७७० स्त्री-पुरुषांची महासभा होती.

चांभार, कुंभार, तेली, न्हावी, परीट, मांग, शेतकरी, शेतमजूर सर्व जातीचे स्त्री-पुरुष या सभेचे सदस्य होते. या सभेत येऊन कोणी काहीही प्रश्न, समस्या विचारायचा. त्यावर सभेत चर्चा घडायची. एकमतानं निर्णय घेतला जायचा.

जगातली पहिली लोकसंसद २७ वर्षे अविरत चालली. लोकसंसदेत बसून शरणांनी ताम्रपटावर १ कोटी वचने लिहिली. शरणांची वचने हीच आज लिंगायत धर्माचा प्रमाण ग्रंथ आहे. वचने लिहिण्याआधी शरण मंडळी गुहेत बसून चिंतन करायची. बसवकल्याणच्या सभोवताली अनेक गुहा अस्तित्वात आहेत.

बसवेश्वरांनी स्वत: कधीही वेगळा धर्म स्थापन केल्याचं सांगितलेलं नाही. पण प्रचलित धर्मापेक्षा वेगळ्या गोष्टी केल्या.

वेगळा देव इष्टलिंग, समता मानतील ते सर्व अनुयानी, कष्टाला प्राधान्य, कायक, दानधर्म, दासोह ही चतु:सुत्री मानेल तो लिंगायत. स्वतंत्र धर्म...

बसवेश्वरांच्या लिंगायत धर्मात एकही जात नाही. ज्यांनी इष्टलिंग गळ्यात बांधले ते सर्व लिंगायत. या तत्वानं १२ व्या शतकात बसवेश्वरांच्या लोकसंसदेन क्रांतिकारी निर्णय घेतला. ब्राम्हण मुलगी आणि चांभार मुलगा यांचा पालकांच्या इच्छेनं संसदेच्या मंजुरीनं विवाह लावला. या विवाहाला १ एक लाख ९६ हजार शरण उपस्थितीत होते.

राजाचा विरोध असताना हा आंतरजातीय विवाह पार पडला. या विवाहानं राजाचा किल्ला, राजवाडा, राज्य हादरलं, कर्मठ चिडले. राजानं वधू आणि वर मातापित्यांचे डोळे काढले, ठार होईपर्यंत हत्तीनं फरफटत नेण्याची शिक्षा दिली, सैनिकांनी शरणांचं हत्यासत्र केलं, वचनभांडाराला आग लावली. या विवाहामुळे बसवेश्वरांना महामंत्रीपद सोडून बिज्जल राजाचं राज्य सोडून जावं लागलं. शरणांनी हाती शस्त्र घेऊन प्रतिकाराचा प्रयत्न केला. आपल्या जन्मगावाकडे परत येत असताना बसवेश्वरांची हत्या झाली असावी असं काही संशोधक मानतात. तर अनुयांयांच्या मते कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा या नद्यांच्या संगमावर बसवेश्वर लिंगऐक्य म्हणजे समाधिस्त झाले.

बागलकोट जिल्ह्यातील हुनगंद तालुक्यात महामार्गावर कुडल संगम हे बसवेश्वरांचे समाधी स्थळ. या समाधीस ऐक्य मंटप म्हणतात. चार दगडी स्तंभांवर शंखाकृती कळस असं समाधीचं मूळ स्वरुप.  समाधी ८५० वर्षांपूर्वी होती त्याच स्थितीत आहे. ३० फूट खोल पाण्यात. आत जाण्यासाठी १२० पायऱ्यांचे चक्राकार दोन मार्ग आहेत. समाधी स्थळापर्यंत जाण्यासाठी सेतू बांधण्यात आला आहे.

बसवनवाडी हे बसवेश्ररांच जन्मगाव.१२ गावाचे कारभारी असलेल्या ब्राह्मण कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला.

वयाच्या १० व्या वर्षी बहिणीला मुंजीचा अधिकार का नाही? असं विचारत बसवेश्वरांनी बसवनवाडी सोडली. कुंडलसंगमला येवून १२ वर्षे शिक्षण घेतलं. मामाच्या गावी म्हणजेच मंगळवेढ्याला आल्यावर बसवेश्वरांचा राजा बिज्जलाशी सबंध आला. स्वकर्तृत्वावर बसवेश्वर कोषागारातले कारकून ते राजाचे प्रधानमंत्री बनले.

बसवनबागेवाडी विजयपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. बसवेश्वरांच्या मूळ घराचं बसवण्णा स्मारकात रूपांतर करण्यात आलं आहे. ८८ फूट उंच स्मारकाच्या सभोवती प्रदक्षिणा पथ आहे. स्मारकात अखंड दगडाचे २३ स्तंभ. आई मादलांबिका आणि बाळ बसवण्णाचं मूर्तीशिल्प आहे. सभोवती बसवेश्वरांच्या आयुष्यातले जीवन प्रसंग उभारण्यात आले आहेत

बसवेश्वरांचा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता. लिंगायत धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक ही कल्पना नाही. बसवेश्वरांनी मंदिरातला स्थावर देव नाकारला. बसवेश्वर आपल्या वचनात म्हणतात...

वेदांवर वार करेल

शास्त्राला बेड्या ठोकून

तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन

आगमाचे नाक कापेन

मी मातंग चन्नय्याच्या घरचा पुत्र आहे पाहा देवा,

महादानी कुडलसंगमदेवा...



बसवेश्वरांना ६२ वर्षाचं आयुष्य लाभलं. आयुष्यभर बसवेश्वरांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह धरला.एकही चमत्कार बसवेश्वरांच्या नावावर नाही. बसवेश्वरांनी ज्ञानाला गुरु मानलं. अशा पुरोगामी भूमिकेमुळं राजा बिज्जल आणि बसवेश्वरांचे शेवटी मतभेद झाले. कर्मठ, सनातनी, कर्मकांड मानणाऱ्या मंडळींनी बसवेश्वरांचा आयुष्यभर दुस्वास केला. १२ व्या शतकातल्या अशा महात्म्याच्या आठवणी जागवतील अशी एकही वास्तू मूळ स्वरुपात नाही. बसवेश्वरांची पहिली लोकसंसदही बसवकल्याणमध्ये दोन धर्माच्या वादात सीलबंद आहे.

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी आज मोर्चे निघत आहेत. ब्रिटीश कालीन जणगणनेचा दाखला दिला जात आहे. ब्रिटिशकाळात १८७१ ते १९३१ या कालावधीत लिंगायताची स्वतंत्र गणना झाली आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेत लिंगायतांची स्वतंत्र धर्म अशीच ओळख आहे. परंतु १९५१ नंतर लिंगायतांची जनगणना झालेली नाही. भारतातल्या सर्व राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात बसवेश्वरांचे अनुयायी आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या चार राज्यात लिंगायतांची लोकवस्ती अधिक आहे. भारतात किमान १० कोटी लिंगायत आहेत, तर महाराष्ट्रात १ कोटी जनसंख्या लिंगायत असावी असा अंदाज आहे.

VIDEO :