पंढरपूर : पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येप्रकरणी सूत्रधार म्हणून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव याला कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून अटक करण्यात आली आहे. गुढीपाडव्याला भरदिवसा संदीप पवार यांची निर्घृण हत्या झाली होती.


'सरजी' या नावाने गुन्हेगारी क्षेत्रात दहशत असलेला गोपाळ अंकुशराव हा भाजपचा जिल्हा परिषद सदस्य असून एका व्यापाऱ्याला धमकावल्या प्रकरणी सध्या कळंबा जेलमध्ये होता. गेल्या महिन्यात गुढी पाडव्याला पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांची दुपारी एक वाजता गोळ्या घालून आणि धारदार शास्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती.

संदीप पवार हे अपक्ष होते. त्यांची आई आणि वडील हे दोघेही पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते. संदीप पवार यांचे वडील दिलीप पवार यांचीही काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे हत्या झाली होती. पवार कुटुंब हे सुरुवातीपासून माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या गटातील मानले जातात.

पंढरपुरात नगरसेवकाची निर्घृण हत्या

या घटनेनंतर पंढरपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिडवडे निघाले होते. या दहशतीत सलग तीन दिवस गाव बंद राहिल्याने अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयजी विश्वास नांगरे पाटील यांनी बैठक घेऊन शहरातील गुंडगिरी समूळ नष्ट करण्याचे आश्वासन दिले होते.

संदीप पवार यांच्या हत्येमागे गोपाळ अंकुशराव हाच असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या पथकाने 'सरजी'ला कळंबा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र सध्या यावर बोलण्यास नकार दिला आहे. संदीप पवार हत्येप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.