मुंबई : एबीपी माझानं दहा वर्षांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. दर्जेदार पत्रकारिता, शेती ते टेक्नॉलॉजी असा आवाका, बातमी मागील बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे ही एबीपी माझाची खासियत. अशा अनेक कारणांमुळे बातमी म्हणजे 'एबीपी माझा' अशी ओळख अल्पावधीतच राज्यातील प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली.

'माझा'ने राज्यातील दुष्काळाचं दाहक वास्तव ड्रोनने दाखवलंच, पण कास पठाराचं सौंदर्य आणि कधी ही न दिसलेला अमेझिंग महाराष्ट्रही एबीपी माझाने टिपला. अजमल कसाबच्या फाशीची बातमी सर्वात आधी 'माझा'ने देशापर्यंत पोहचवली, महाराष्ट्राच्या राजकारणातील बारकावे... गल्ली ते दिल्ली घडामोडी इथेच समजतात.

सिंहासन, रामराज्य, सर्वव्यापी आंबेडकर, आक्रोश गडकिल्ल्यांचा, नद्यांचे अश्रू, पानिपतच्या पाऊलखुणा, इस्रायलची शेती, वनपुरुष, जलपुरुष, हुंडा परिषदेसारखे उपेक्षित, दुर्लक्षित विषय लावून धरत 'माझा'ने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

अशा नवनव्या प्रयोगांमुळेच ट्रेन्ड सेटर म्हणून एबीपी माझाकडे पाहिलं जातं. एबीपी माझा हे महाराष्ट्राच्या सुजाण जनतेच्या मनातलं नंबर वन चॅनल बनलं, आणि थोडीथोडकी नव्हे तर सतत दहा वर्ष जनतेनं एबीपी माझाला हे प्रेम दिलं.

जनतेचा हा विश्वास टिकवून ठेवण्यात 'माझा'ने ही कुचराई केली नाही. सामाजिक बांधिलकी जपत मराठी टीव्ही पत्रकारितेला वेगळी दिशा देण्याचं काम एबीपी माझा यापुढेही करतच राहील. न्यूजचा राजा एबीपी माझा.

यंदा 'एबीपी माझा'च्या 'माझा सन्मान' सोहळ्यात नवरत्नांचा गौरव करण्यात आला. कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रख्यात अभिनेेते अजय देवगन अशा मान्यवरांच्या हस्ते या रत्नांना सन्मानित करण्यात आलं.

'माझा सन्मान'ने गौरवण्यात आलेल्या दिग्गजांचा अल्प परिचय :

अमोल यादव

ही भरारी आहे एका तपश्चर्येची.... हे उड्डाण आहे एका स्वप्नाचं.... ही झेप आहे एका ध्येयवेड्या मराठी तरुणाची... डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव.. व्यवसायाने वैमानिक, पण अमेरिकेत विमानोड्डाणाचं प्रशिक्षण घेतानाच विमान बनवण्याच्या कल्पनेने तो झपाटला गेला... भारतात परतल्यानंतर 1998 मध्ये अमोलनं विमान बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. विमान बनवण्याचं कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण नसतानाही त्या ध्यासानं अमोल झपाटला.


सुरुवातीला अनेक प्रयोग फसले खरे.. पण अशा परिस्थितीतही त्याच्या स्वप्नांना बळ देत होतं त्याचं कुटुंब... आणि मग ध्येयवेड्या अमोलने तब्बल 17 वर्षांच्या मेहनतीनंतर संपूर्णतः भारतीय बनावटीचं अत्याधुनिक सहाआसनी विमान तयार केलं आणि तेही आपल्या मुंबईतल्या इमारतीच्या गच्चीवरच.

‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्याचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्याच्यासमोर विमानं बनवण्याचे प्रस्ताव ठेवले. आपल्या महाराष्ट्रातच कंपनी उभारायचं त्याचं स्वप्न आज साकार होत आहे. विमान निर्मितीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवणाऱ्या या अवलियाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी 'माझा'च्या शुभेच्छा.

------

कांताबाई सातारकर

संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या कांताबाई सातारकर.... कांताबाई सातारकर यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झंकार कलापथकात काम करण्याकरीता पायत घुंगरु बांधले आणि तिथूनच सुरु झाला त्यांच्या लोककलेचा प्रवास....

घराची जबाबदारी पेलण्याकरीता लहानपणीच कामाला सुरुवात केली.. अहिरवाडीकरांच्या तमाशा मंडळात अवघ्या 20 रुपये मासिक बिदागीवर व्यावसायिक मंडळातून आपण रंगमंचावर पदार्पण केलं. सातारा, फलटण पुणे करत वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबई गाठली आणि त्याकाळी तमाशा क्षेत्रात दादा असलेल्या तुकाराम खेडकरांच्या फडात दाखल झालात.


वर्षभरात खेडकरांची पत्नी आणि फडाची मालकीण झालात. पण संसार आणि रंगमंच अशी दुहेरी कसरत सुरू असतांना अचानक झालेल्या पतीच्या निधनाने आकाश कोसळले. पण खचून न जाता आपण कंबर कसली, जुळवाजुळव केली आणि कांताबाई सातारकर हा फड पुन्हा उभा केला.

जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर आपले घुंगरु पुन्हा नाचू लागले. ते कायमचे.. परंपरागत लोककलेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या कांताबाई सातारकर, यांना 'एबीपी माझा'चा मानाचा मुजरा

--------

डॉ. संजीव धुरंधर

गेल्या वर्षी खगोलशास्त्रातल्या एका मोठ्या प्रयोगाला यश आलं. जगभरातील शास्त्रज्ञांनी 100 वर्षापूर्वी वर्तवण्यात आलेलं एक भाकीत हे निरीक्षणं आणि विश्लेषणांच्या आधारावर सिद्ध केलं. गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाची ती घोषणा होती. या शोधात मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ संजीव धुरंधर यांची मोलाची भूमिका होती.

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांच्या चमूने लहरींबाबत अचूक नोंदीचे तंत्र विकसित केले आहे. स्वत: डॉ. संजीव धुरंधर हे विख्यात खगोलभौतिकशास्त्रज्ञ असून, गुरुत्वीय लहरींचा शोध आणि त्यांची निरीक्षणे हा त्यांचा मुख्य विषय आहे. गुरुत्वीय लहरींचा वेध घेणाऱ्या डिटेक्टरवर मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि त्याबाबतचे कम्प्युटर मॉडेलिंग विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.


गेल्या अठरा वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील लिगोसारख्या समूहाशी संबंधित असून, या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संशोधनात मोलाचा वाटा उचलत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांसाठी आणि संशोधनातल्या पुढील वाटचालीसाठी 'एबीपी माझा'च्या शुभेच्छा.

------------

केदार जाधव

भारतीय क्रिकेटमधला तुमचा आमचा म्हणजे कॉमनमॅनचा चेहरा. पण गेल्या नऊ महिन्यांमधल्या कामगिरीनं त्या चेहऱ्याला नवं ग्लॅमर मिळवून दिलं आहे. महाराष्ट्राचा लाडका केदार जाधव बनला आहे.

वन डे सामन्यांमधला टीम इंडियाचा स्टार. 2015 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यात शतक झळकावूनही, तो भारताच्या वन डे संघाचा अविभाज्य घटक बनला नव्हता. पण 2016 या वर्षानं वन डेच्या दुनियेला दिला नवा केदार जाधव. कॉन्फिडन्ट आणि निडर.


फलंदाजी असो वा गोलंदाजी, कर्णधाराच्या हाकेला धावून जाणारा केदार वारंवार दिसू लागला. 2016 सालची दिवाळी आपण त्याच्याच न्यूझीलंडविरुद्धच्या यशानं साजरी केली.

इंग्लंडविरुद्धच्या पुण्याच्या वन डेतलं केदारचं शतक तर लाजवाब. साक्षात विराट कोहलीशी फटक्यांची जुगलबंदी खेळून त्यानं भारताला धावांचा एव्हरेस्ट गाठून दिला. या कामगिरीनं केदारवरच्या अपेक्षांचं ओझंही आता वाढलं आहे.

भारतीय क्रिकेटरसिकांच्या त्या अपेक्षांची पूर्ती व्हावी म्हणून केदार जाधवला साऱ्या महाराष्ट्राच्या वतीनं 'एबीपी माझा'च्या शुभेच्छा.

-------------

सलीम शेख

तारीख 10 जुलै 2017... बाबा अमरनाथचं दर्शन करुन यात्रेकरुंनी भरलेली बस जम्मूच्या दिशेने जात होती. रात्रीचे 8 वाजले होते.. यात्रेकरुंनी भरलेल्या या बसने अनंतनाग पार केलं आणि बुटिंग जवळ अचानक बसवर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला... समोरुन अतिरेक्यांचा गोळीबार सुरु असतानाही बस चालक सलीम शेखने प्रसंगावधान राखलं, गाडी सुसाट सोडली आणि पुढे सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला.

सलीमच्या या असामान्य धैर्यामुळे, हिंमतीमुळे तब्बल 50 भाविकांचा जीव वाचला होता.. सलीमच्या रुपाने जणू देवच यात्रेकरुंच्या मदतीला धावून आला होता. गुजरातच्या वलसाडमध्ये राहाणारा सलीम शेख गेली आठ वर्ष यात्रेकरुंना अमरनाथला घेऊन जात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचा जीव वाचवला याचा सलीमच्या कुटुंबीयांना अभिमान आहे. सलीमच्या या जिगरबाज धाडसाला 'एबीपी माझा'चा सलाम आणि

त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा


-----------

शांतिलाल मुथा

शांतिलाल मुथा हा पासष्टीतला उत्साही तरुण. बीड जिल्ह्याच्या डोंगरकिन्ही या छोट्याश्या गावात एका मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला हा तरुण शांतीलाल मुथा फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मागास, दुर्लक्षित, उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी गेल्या 60 वर्षांपासून झटत आहे.

मारवाडी असल्याने उत्तम व्यावसायिक म्हणून काम करतांनाच त्यांचं सामाजिक भान जागं झाले ते वारेमाप पैसा खर्च होणारी लग्न पाहून. ज्या समाजात लग्नावर सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो, त्या स्वतःच्या जैन समाजातल्या 25 जोडप्यांचा देशातला पहिला सामुहिक विवाह सोहळा आयोजित करुन त्यांनी समाजकार्याची कृतीशील सुरुवात केली.


आजपर्यंत शांतिलालजींनी हजारो जोडप्यांचे संसार सुरु करुन दिले. त्यांनी राज्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सव्वातीनशे मुलं दत्तक घेतली. ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मूल्यवर्धनाचा राज्यस्तरीय प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. 1993 च्या राज्याला हादरवणाऱ्या भूकंपाच्या दरम्यान मुथ्था यांच्या संस्थेच्या पुढाकाराने सुमारे महिनाभर रोज 10 हजार लोकांना अन्नदान करण्यात आलं. या दरम्यान जमीनदोस्त झालेल्या 368 शाळा त्यांनी पुन्हा बांधून दिल्या. त्यांचं काम केवळ महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नाही तर देशभर पसरलं आहे. अशा या तरुणाला 'एबीपी माझा'चा सलाम.

------

मुक्ता बर्वे

काय शोधाया निघाले, कुठे येऊन ठेपले, कसे अनोख्या दिशेने, असे पाऊल पडले,

वाट अनवट पुसट, चालताना फरपट, तरी जिंकावासा वाटे, अनोळखी सारीपाट

मुक्तानं लिहिलेल्या या ओळी तिच्या खऱ्या आयुष्यात अगदी चपखल बसत आहेत. मुक्ता बर्वे.. हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अभ्यासू, चोखंदळ, स्वतंत्र विचारांची प्रतिभावान अभिनेत्री... नाटक, सिनेमा, मालिका या तिन्ही माध्यमांवर आपली पकड असणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक.. मुक्ता बर्वे....

सशक्त अभिनयाच्या जोरावर तिनं तिच्या प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवला आहे. म्हणूनच एक डाव धोबीपछाड, सुंबरान, मुंबई पुणे मुंबई, मंगलाष्टक वन्स मोअर, लग्न पाहावे करुन, डबलसीट सारखे सिनेमे आपल्या आजही लक्षात राहतात.


रुपेरी पडद्यावरची आघाडीची अभिनेत्री असूनही मुक्ताचं रंगभूमीशी असलेलं नातं तितकंच घट्ट आहे. रसिका-अनामिका या नाट्य संस्थेची निर्मिती करुन तिनं हे सिद्ध केलं आहे.

जितका सक्षम तिचा अभिनय तितक्याच दमदार नाट्यकृतींची निर्मिती ती या संस्थेच्या माध्यमातून करत आहे. छापा-काटा, रंग नवा, लव्हबर्ड्स, इंदिरा, दीपस्तंभ, कोडमंत्र ही मुक्ताने केलेल्या नाटकांची नावच सगळं काही सांगून जातात. प्रत्येक नाटकांमध्ये तिनं विषयांचं वेगळेपण जपलं आहे.

रुढार्थाने अभिनेत्रींच्या व्याख्येत मुक्ताचं सौंदर्य बसत नाही पण तिला पाहताच सक्षमतेची कल्पना येते. अनवट वाटेने जाणाऱ्या आणि तिन्ही माध्यमं दशांगुळे व्यापून टाकणाऱ्या मुक्ताला तिच्या पुढील वाटचालीसाठी 'माझा'च्या शुभेच्छा.

-----------

राहुल देशपांडे

आपल्या स्वर्गीय गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा अवलिया गायक राहुल देशपांडे… त्याचं गाणं हीच त्याची ओळख… श्रेष्ठ गायक वसंतराव देशपांडेंचा वारसा राहुलने अगदी समर्थपणे पेलला आहे.

राहुलच्या ख्याल गायनात वजन आहे. सूर-तालाची मजा आहे. नाटय़संगीत, भावगीत, भजन या सुगम संगीताच्या प्रकारांवर तर त्याची हुकूमत आहे. म्हणूनच त्यानं गायलेलं 'घेई छंद मकरंद' जेवढं कानांना गोड वाटतं तेवढंच 'कानडा विठ्ठलू' हृदयाला भिडतं.


पारंपरिक संगीताला पुढे घेऊन जात असताना राहुल आजच्या काळातल्या माध्यमांवरही तितकाच सक्रीय असतो. मैफलीतलं गाणं थेट फेसबुकवर आणून चाहत्यांची फर्माइश लाईव्ह पूर्ण करणं हा राहुलचा आवडता छंदच झाला आहे. केवळ गाणंच नव्हे तर अनेक संगीत नाटकांमधून राहुलने त्याचं अभिनय कौशल्यही सिद्ध केलं आहे.

सध्या सुरु असलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकाला रसिकांची होत असलेली गर्दी ही त्याचीच पोहोचपावती. शास्त्रीय संगीत विश्वातल्या या सुरेल ताऱ्याला 'एबीपी माझा'च्या खूप खूप शुभेच्छा!

-------

राज कांबळे

जे सरळ साधं दिसतं त्या सगळाकडे वेगळ्या दृष्टीनकोनातून तो बघतो.... आणि म्हणूनच तो आहे क्रिएटिव्ह जाहिरातींचा बादशाह.. राज कांबळे... माझगाव ते न्यूयॉर्क व्हाया सारं जग, असा त्याचा क्रिएटिव्ह प्रवास..

करिअरच्या सुरुवातीला इंजिनिअरिंगसाठी व्हीजेटीआयमध्ये अॅडमिशन घेतली खरी... पण 8 दिवसात आपलं गणित चुकलं आहे, हे राजच्या लक्षात आलं आणि एक अधिक एक बरोबर दोन करण्यापेक्षा एक अधिक एक क्रिएटिव्हली कसं दाखवू शकतो याचा तो विचार करु लागला. आणि या क्रिएटिव्हिटीला मोकळा मार्ग मिळवून देण्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी सर जे जे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि इथून सुरु झाला त्याचा आणि जाहिरातींचा क्रिएटिव्ह प्रवास.


साध्या आणि सोप्या भाषेत जाहिरातीच्या माध्यमातून आपला मुद्दा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवण्यात राज कांबळेचा हातखंडा आहे. आणि म्हणूनच अनेक जगप्रसिद्ध पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. त्यात इंग्लंडच्या ‘डीएनडी” आणि कान्स फेस्टिव्हलच्या गोल्डन लायन या प्रतिष्ठेच्या पारितोषिकांचा समावेश आहे.

यंदाच्या 'कान्स लायन्स फेस्टिवल ऑफ क्रिएटिव्हिटी'मध्ये जाहिरातींच्या विभागासाठी राज कांबळेने ज्युरी म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं. ऐन तारुण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात क्षेत्रातील क्रिएटिव्हिटीवर मराठी मोहर उमटवणारा जाहिरातींचा बादशाह, राज कांबळेला त्याच्या पुढील क्रिएटिव्ह वाटचालीसाठी 'माझा'च्या भरभरून शुभेच्छा.