पालघर जिल्हा परिषद : पालघर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे एकमेव सदस्य देवानंद शिंगडे यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विक्रमगड येथील एका कार्यक्रमात देवानंद शिंगडे यांच्या सोबत चिंचणी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच केतन पांचाळ,संजय यादव आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी  देखील भाजपची वाट धरली.एकमेव जि.प.सदस्य भाजपात गेल्याने काँग्रेसची पालघर जिल्हा परिषदेतील पाटी आत्ता कोरी झाली आहे.


जानेवारी 2020 साली झालेल्या पालघर जिल्हा परिषद निवडणूकीत देवानंद शिंगडे हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार डहाणू तालुक्यातील चिंचणी गटातून निवडून आले होते. देवानंद शिंगडे हे खासदार राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये असल्यापासून त्यांचे खंदे समर्थक मानले जात होते. त्यांचा भाजप प्रवेश हा गावितांसाठी देखील धक्का मानला जातो. 


पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या जागा वाढल्या तर राष्ट्रवादीच्या तीन जागा घटल्या


एकेकाळी पालघर जिल्ह्यात प्रबळ असलेल्या काँग्रेसला मागील काही वर्षापासून उतरती कळा लागली असून जिल्ह्यात काँग्रेसचा सध्या एक ही खासदार, आमदार आणि जि. प.सदस्य उरलेला नाही.त्यातच नुकत्याच झालेल्या जि. प. पोटनिवडणुकीत राज्यात सत्ता असताना स्वबळावर लढून देखील सर्व जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता.


जिल्ह्यात काँग्रेसकडे नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी स्थिती असून नवीन जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांच्याविरोधात माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांच्या गटाने बंड केले आहे . पालघर जिल्ह्यात शिवसेना, भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस,कम्युनिस्ट पक्ष,बहुजन विकास आघाडी हे प्रमुख पक्ष आपली स्थिती सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा पाय मात्र अजून खोलात जात असल्याचे चित्र दिसत आहे. 


Palghar ZP By Election : पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम? शिवसेनेच्या जागा वाढल्या


ZP Panchayat Samiti By Elections : नागपूर, नंदुरबार, अकोला आणि पालघर येथे काय आहेत राजकीय समीकरणं?